देशातील तरुणांपैकी फक्त ८ टक्के तरुणांनाच नोकरी, ९० टक्के तरुण बेरोजगार, भयंकर वास्तव आलं समोर…

मुंबई : देशात सध्या बेरोजगारी वाढली आहे. यामुळे तरुणांना नोकरी मिळत नसल्याने शिक्षण वाया जाते की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’, ‘विकसित भारत’ अशा घोषणांचा केंद्र सरकार पिटत असलेला ढोल नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाच्या एका दणक्यात फोडून टाकला.
देशातील पदवीधर तरुणांपैकी फक्त ८.२५% तरुणांनाच त्यांच्या पात्रतेशी सुसंगत नोकरी मिळत असेल आणि ९०% पेक्षा जास्त पदवीधरांची क्षमता आणि शिक्षण वाया जात असेल तर सरकारने आता नेहरूंवर टीका करण्याचं रडगाणं थांबवून नीती आयोगाच्या अहवालाच्या आरशात स्वतःचा चेहरा आधी बघावा.

याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तरुणांच्या हातात पदवी असूनही त्यांना रोजगार नसणं ही केवळ धोरणात्मक चूक नाही, तर त्यांच्या भविष्याशी केलेली थट्टा आहे! १२ वर्षे सत्तेत राहूनही तरुणांना रोजगार देता येत नसेल तर ९० टक्के तरुणांनी अजूनही फक्त पकोडेच तळायचे का? असेही ते म्हणाले.


देशातील जेन-झी आणि आता तर जेन-अल्फाही जागरूक झालीय. त्यामुळे नीती आयोगाचा अहवाल बघून तरी केंद्र सरकारने डोळे उघडावेत आणि केवळ आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी नेहरू-गांधींवर टीका करत बसण्यापेक्षा स्वतःच्या चुकांची दुरुस्ती करून खऱ्या अर्थाने रोजगारक्षम अर्थव्यवस्थेसाठी पूरक अशी धोरणं राबवावीत. अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सध्या शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ सुरू आहे. अनेक ठिकाणी पेपर फुटत आहेत. परीक्षेत निवड झाली तरी लवकर नोकरी मिळत नाही. अनेक ठिकाणी अशा घटना घडत आहेत. नुकताच शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. यामुळे येणाऱ्या काळात सरकार शिक्षण क्षेत्रात धोरणात्मक निर्णय घेणार का? हे बघणे महत्वाचे आहे.