साखर 70 पार, कांदा दुप्पट अन् लसूण 200 वर! सणाआधीच महागाईचा तडाखा; सरकारची ‘कांदा एक्सप्रेस’ धावणार

मुंबई : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा एकदा कोलमडण्याची चिन्हे आहेत. साखर, कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणींचे महिन्याचे गणित बिघडले आहे. गेल्या महिनाभरात साखरेच्या किरकोळ दरात तब्बल 30 टक्क्यांनी वाढ झाली असून काही राज्यांमध्ये साखरेचा भाव 70 रुपये किलोच्या पुढे गेला आहे. त्यातच कांद्याचे दर 25 रुपयांवरून 45 ते 50 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, तर चांगल्या प्रतीचा लसूण 200 रुपये किलोच्या पुढे विकला जात आहे.
साखरेच्या दरात महिनाभरात मोठी वाढ

ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 24 जुलै रोजी साखरेची सरासरी किरकोळ किंमत सुमारे 48 रुपये किलो होती. 24 ऑगस्टपर्यंत हाच दर 63 ते 65 रुपयांवर पोहोचला. काही भागांत ग्राहकांना 70 रुपये किलोपेक्षा जास्त दराने साखर खरेदी करावी लागत आहे. घाऊक बाजारात साखरेचा दर साधारण 58.29 ते 59.23 रुपये किलो असल्याचे सांगण्यात आले आहे.


साखरेच्या दरवाढीमागे ऊस पिकावर झालेला अतिवृष्टीचा परिणाम आणि ‘रेड रॉट’ अर्थात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हे प्रमुख घटक असल्याचे सांगितले जात आहे. जागतिक बाजारातील तुटवड्याचाही परिणाम दरांवर झाला आहे. मात्र, सरकारने साखरेच्या वाढत्या किमतींसाठी इथेनॉल निर्मितीला जबाबदार धरलेले नाही.
कांद्यानेही ग्राहकांना रडवलं
साखरेनंतर कांद्याच्या वाढत्या दराने ग्राहकांची चिंता वाढवली आहे. किरकोळ बाजारात कांदा सध्या 45 ते 50 रुपये किलोपर्यंत पोहोचला असून काही शहरांमध्ये त्याचा भाव 60 ते 65 रुपयांवरही गेला आहे. महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे घाऊक दर सुमारे 2,600 ते 3,850 रुपये क्विंटल म्हणजेच 26 ते 38.50 रुपये किलोच्या आसपास आहेत.
लांबलेला पाऊस आणि साठवून ठेवलेला कांदा खराब झाल्याने बाजारातील आवक घटली आहे. परिणामी, गेल्या वर्षाच्या तुलनेत कांद्याच्या सरासरी किमतीत तब्बल 59 टक्क्यांची वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.
लसूण 200 रुपयांच्या पुढे
कांद्यासोबत लसणाच्या दरानेही उच्चांक गाठला आहे. चांगल्या दर्जाचा लसूण किरकोळ बाजारात 200 रुपये किलोच्या पुढे विकला जात आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये लसणाचा घाऊक दर गुणवत्तेनुसार 11 हजार ते 18 हजार 500 रुपये क्विंटल म्हणजेच 110 ते 185 रुपये किलोदरम्यान आहे.
महागाई रोखण्यासाठी सरकारची धावपळ
कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत. महाराष्ट्रातील नाशिक भागातून देशातील प्रमुख शहरांमध्ये कांद्याचा पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून विशेष ‘कांदा एक्सप्रेस’ चालवली जात आहे. याशिवाय नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ग्राहकांना कांदा 35 रुपये किलो या सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सरकारच्या हस्तक्षेपामुळे घाऊक बाजारातील साखरेच्या दरावर काही प्रमाणात नियंत्रण येण्यास सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत त्याचा परिणाम किरकोळ बाजारातही दिसून येण्याची शक्यता आहे. मात्र, सणासुदीच्या आधी साखर, कांदा आणि लसणाच्या वाढलेल्या दरामुळे सामान्य ग्राहकांना सध्या महागाईचा मोठा फटका बसत आहे.