नर्सरीतून १७ वर्षीय मुलगी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याचा संशय


लोणी काळभोर, ता. २४ : हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धुमाळ मळा परिसरातील नर्सरीमध्ये मजुरीसाठी गेलेली १७ वर्षीय मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला असून, याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलगी ही तिची लहान बहीणीसोबत कुंजीरवाडी येथील स्वामी समर्थ नर्सरीमध्ये मजुरीचे काम करीत होती. शनिवारी (ता. २२) सकाळी दोन्ही बहिणी नेहमीप्रमाणे कामासाठी नर्सरीत गेल्या. काजल मातीच्या पिशव्यांमध्ये माती भरण्याचे काम करीत असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे ती काही वेळ नर्सरीतील एका खोलीत जाऊन बसली होती.

पाऊस थांबल्यानंतर ती पुन्हा कामावर परतली नाही. त्यामुळे तिच्या बहीणीने नर्सरीच्या मालकीणीकडे चौकशी केली असता, ‘ऑनलाइन पार्सल आले असून ते घेऊन येते,’ असे सांगून ती नर्सरीतून गेल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काजलच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याचे आढळले.

मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच तिच्या वडिलांनी नर्सरी परिसरात धाव घेतली. कुटुंबीय व नातेवाईकांनी परिसरात तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेतला; मात्र तिचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. बेपत्ता मुलगी सुमारे चार फूट सहा इंच उंचीची, गोऱ्या रंगाची व सडपातळ बांध्याची असून तिचे लांब काळे केस, सरळ नाक व गोल चेहरा आहे. बेपत्ता होताना तिने लाल रंगाचा कुर्ता व काळ्या रंगाची लेगिंग परिधान केली होती. तिच्या कानात सोन्याच्या रिंगा असून तिच्याकडे मोबाईल फोन होता. लोणी काळभोर पोलिसांकडून तिचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!