पुण्यात रुपाली चाकणकर प्रकरणात मोठी घडामोड; दिपाली सय्यद, सुषमा अंधारे यांच्यासह 19 जणांवर गुन्हा


पुणे : पुण्यात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बदनामीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. चाकणकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विविध राजकीय पक्षांशी संबंधित व्यक्ती तसेच सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे आणि वर्षा कांबळे यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी संबंधित सोशल मीडिया पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांच्याविरोधातही कारवाई करण्यात आली आहे.

चाकणकर यांच्या तक्रारीनुसार, अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची काही वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. खरात यांना मार्च 2026 मध्ये एका गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचे जुने फोटो वापरून चाकणकर यांच्याबाबत विविध आरोप करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

चाकणकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरील काही अकाउंट्सवरून आक्षेपार्ह, बदनामीकारक आणि धमकीवजा पोस्ट करण्यात आल्याचा आरोप केला आहे. संबंधित पोस्टचे स्क्रीनशॉट आणि अकाउंट्सची माहिती पोलिसांकडे सादर करण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर संबंधितांवर नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!