महाराष्ट्राच्या हवामानात अचानक बदल! सोमवारी जोरदार पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा नवा अलर्ट

पुणे : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्यातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. पुढील 24 तासांत काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता असून, पुढील काही दिवस दमट आणि उष्ण हवामान राहण्याचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही.


पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाटमाथ्याला यलो अलर्ट देण्यात आला असून, या भागात जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मराठवाड्यात तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट
परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
विदर्भातही पावसाचा जोर वाढणार
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील एक ते दोन दिवस विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहू शकतो. इतर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
राज्यातील एकूण परिस्थिती पाहता विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आणि नागरिकांना व्यापक पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागू शकते. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.