राष्ट्रवादीच्या कोर्टातील लढाईवर सुप्रिया सुळेंचा मोठा दावा; ‘निवडणूक आयोगात जिंकलं असेल, पण…’


मुंबई : काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या निर्मितीबाबत केलेल्या दाव्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 2014 मध्ये मविआचा प्रस्ताव नाकारला, तर 2019 मध्ये आपणच मविआ स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.

यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. 2014 मध्ये नकार आणि 2019 मध्ये होकार दिला गेला, त्यावेळी सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या. त्यामुळे याबाबत त्यांनाच विचारावं लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रातील काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकदा चुकीच्या पद्धतीने पाहतात, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या. मात्र, दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी आपले नियमित संपर्क आणि संवाद असल्याचं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांच्याबाबत आपल्याला अशी भावना वाटत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.

‘महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील काँग्रेसमध्ये कदाचित सुसंवादाचा अभाव असावा,’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी दोन्ही स्तरांवरील भूमिकांमध्ये काही फरक असल्याचं सूचित केलं.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या वादावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाची अजित पवार गटाविरोधातील न्यायालयीन लढाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

पक्ष आणि संघटना ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नसून, पक्ष चुकीच्या पद्धतीने शरद पवारांकडून काढून घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. ही लढाई कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून प्रक्रिया आणि नियमांसाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

निवडणूक आयोगात चुकीच्या पद्धतीने विजय मिळवला असेल, मात्र न्यायालयात तसं होऊ शकत नाही, असा विश्वासही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!