कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही शेतकऱ्याचा मृत्यू; वारसांना लाभ मिळणार की नाही? सरकारचा निर्णय काय?


पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र यादीत नाव असूनही आधार प्रमाणीकरण पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांच्या कायदेशीर वारसांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

यासाठी संबंधित कर्ज खात्यावर कायदेशीर वारसांची अधिकृत नोंद करून सुधारित माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत.

कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील १६.९६ लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यापैकी १३.४८ लाख शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, सुमारे ३.४८ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. या प्रक्रियेदरम्यान मृत्यू झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मात्र योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही.

मृत लाभार्थ्यांच्या वारसांची माहिती अद्ययावत करण्यासाठी महाआयटीच्या माध्यमातून विशेष कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि सहकार विभागाचे अधिकारी संबंधित कर्ज खात्याची तपासणी करतील. त्यानंतर शासकीय लेखापरीक्षकांकडून पडताळणी पूर्ण झाल्यावर सुधारित माहिती पोर्टलवर अपलोड केली जाईल.

कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित वारसांकडे अधिकृत वारसपत्र किंवा कायदेशीर वारस नोंद असणे आवश्यक आहे. तसेच अग्रीस्टॅक नोंदणीही पूर्ण असणे बंधनकारक आहे.

एका मृत शेतकऱ्याचे एकापेक्षा जास्त कायदेशीर वारस असल्यास मंजूर कर्जमाफीची रक्कम त्यांच्या कायदेशीर हिश्श्यानुसार संबंधित खात्यांमध्ये वर्ग केली जाणार आहे. त्यामुळे आधार प्रमाणीकरणाआधी मृत्यू झालेल्या पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!