‘एका थेंबात विष?’ तुकाराम मुंढेंचा खाद्यतेल उद्योगावर धडाका; सुट्टं तेल विकणारे-विकत घेणारे दोघेही रडारवर

मुंबई : राज्यातील भेसळखोरांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता खाद्यतेल बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केले आहे. दूध, पनीर आणि मिठाईनंतर आता खाद्यतेलातील गैरप्रकारांवर मोठी कारवाई होणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. राज्यभरातील तेल उत्पादक, वितरक, ऑनलाइन विक्रेते, घाऊक व्यापारी आणि किराणा दुकानदारांसाठी नव्या कडक सूचना जारी करण्याची तयारी सुरू झाली आहे.
FDA च्या तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्याचे मुंढे यांनी सांगितले. काही कंपन्या आवश्यक नोंदणीशिवाय तेल विक्री करत असल्याचे आढळले आहे. याशिवाय मोहरीच्या तेलात इतर तेलांचे मिश्रण, मुदत संपलेले तेल नव्या पॅकिंगमध्ये विकणे आणि स्रोत नोंद नसलेले तेल बाजारात आणण्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा उत्पादनांमुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्यांनी दिला.

विशेष म्हणजे राज्यात मोठ्या प्रमाणावर सुट्ट्या स्वरूपात खाद्यतेलाची विक्री होत असल्याची बाबही FDA च्या निदर्शनास आली आहे. असे तेल कुठून आले, त्याची गुणवत्ता काय आहे आणि त्यावर कोणतीही अधिकृत तपासणी झाली आहे का, याची माहिती उपलब्ध नसते. त्यामुळे ग्राहकांनी फक्त सीलबंद आणि अधिकृत पॅकेजिंगमधील तेलच खरेदी करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


हॉटेल आणि खाद्य व्यवसायिकांनाही FDA ने कठोर संदेश दिला आहे. तळणीसाठी वापरलेले तेल पुन्हा-पुन्हा वापरणे अनेक ठिकाणी सुरू असून त्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. संशोधनानुसार अशा तेलामुळे हृदयविकार, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि इतर दीर्घकालीन आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे वापरलेल्या तेलाच्या पुनर्वापरावर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
FDA लवकरच राज्यभर व्यापक तपासणी मोहीम सुरू करणार असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. भेसळ, चुकीचे लेबलिंग, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांना 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि गंभीर प्रकरणांत 7 वर्षांपासून आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते.
ग्राहकांनी तेल खरेदी करताना उत्पादनाची तारीख, मुदत संपण्याची तारीख, FSSAI परवाना क्रमांक आणि पॅकेजवरील माहिती तपासावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. खाद्यतेल क्षेत्रातील या नव्या मोहिमेमुळे राज्यातील भेसळखोर आणि बेकायदेशीर व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून FDA च्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.