शरद पवार-पार्थ पवारांची तीन तास गुप्त भेट! नेमकी काय चर्चा झाली? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात काल रात्री तब्बल तीन तास बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.
या बैठकीत राज्यातील विविध राजकीय घडामोडी आणि विकासकामांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, बैठकीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार रात्री सुमारे 8.15 वाजता शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास तीन तासांच्या चर्चेनंतर रात्री 11.15 वाजता ते तेथून बाहेर पडले. आजोबा आणि नातवामधील या प्रदीर्घ भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.


या भेटीदरम्यान राज्यातील राजकीय परिस्थिती, विविध विकास प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून या बैठकीचा तपशील जाहीर करण्यात आलेला नाही.
पार्थ पवार केंद्रात जाणार?
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्याची चर्चा आहे. या विस्तारात अजित पवार यांच्या गटाला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य मंत्रिपदासाठी पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीत या मुद्द्यावरही चर्चा झाली असावी, असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा दुजोरा मिळालेला नाही.
बारामतीतील विकासकामांवरही चर्चा?
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीत बारामतीतील विकासकामांबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचं स्मारक उभारण्याच्या कामासह काही स्थानिक विकास प्रकल्पांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, याचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
15 दिवसांनंतर पवार कुटुंबातील महत्त्वाची भेट
सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे यांच्या रिसेप्शनला सुमारे 15 दिवसांपूर्वी पवार कुटुंबीय एकत्र आले होते. या कार्यक्रमाला देशभरातील अनेक प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते. त्यानंतर पार्थ पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने या भेटीला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली आणि पार्थ पवार यांच्या राजकीय भवितव्याबाबत काही निर्णय झाला का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.