महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा तडाखा! हवामान विभागाचा मोठा इशारा; ताशी 70 किमी वेगाने वारे, जोरदार पाऊस अन् गारपिटीची शक्यता

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी-अधिक होताना दिसत आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहिले असले, तरी पुढील काही दिवसांत राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड, परभणी, अहिल्यानगर आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता असून, या भागांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच धाराशिव, लातूर, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 20 ऑगस्ट रोजी दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील 15 राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांत ताशी 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. डोंगराळ भागांत दरडी कोसळण्याचा धोका असून, काही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्याच्या पूर्व भागातील धरणांमध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही. अक्कलकुवा-वडफळे परिसरातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे.
नदी-नाल्यांना अद्याप मोठा प्रवाह आलेला नसल्याने धरणे भरण्यासाठी आणखी दमदार पावसाची गरज आहे. सध्या पिकांना विहिरी आणि कूपनलिकांच्या पाण्याचा आधार मिळत असला, तरी भूजलपातळी वाढण्यासाठी आणि आगामी सिंचनाची गरज भागवण्यासाठी पुरेसा पाऊस आवश्यक आहे.
राज्यात काही भागांत पाऊस सुरू असला, तरी अनेक ठिकाणी अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे खरीप हंगामासह धरणे आणि जलसाठे भरण्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे.