‘अयोध्या राम मंदिर प्रसाद’ विकणे महागात! ॲमेझॉनला 1 लाखांचा दणका, काय आहे प्रकरण?

मुंबई : ॲमेझॉनवर ‘अयोध्या श्री राम मंदिर प्रसाद’ या नावाने मिठाईची विक्री केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांची दिशाभूल केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
अयोध्येतील श्री राम मंदिराचा प्रसाद मिळावा, अशी अनेक भाविकांची इच्छा असते. याच श्रद्धेचा गैरफायदा घेत ॲमेझॉनवर कोणतीही अधिकृत मान्यता नसताना काही मिठाई ‘अयोध्या श्री राम मंदिर प्रसाद’ म्हणून विकली जात असल्याची तक्रार करण्यात आली होती.

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने जानेवारी 2024 मध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सीसीपीएने या प्रकरणाची चौकशी केली.


CCPA ने काय म्हटलं?
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची परवानगी नसताना त्यांच्या नावाचा वापर करून व्यावसायिक विक्री करणे हे ग्राहकांची दिशाभूल करणारे असल्याचं CCPAने म्हटलं आहे. त्यामुळे ॲमेझॉन सेलर सर्व्हिसेसवर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.
ॲमेझॉनचा युक्तिवाद फेटाळला
ॲमेझॉनने आपण केवळ विक्रेत्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो आणि आपली भूमिका मध्यस्थाची असल्याचा युक्तिवाद केला. तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 79 अंतर्गत ‘सेफ हार्बर’ संरक्षणाचा दावा करण्यात आला.
मात्र, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं सादरीकरण आणि उत्पादनांची विक्री सुलभ करण्यात ॲमेझॉनची भूमिका असल्याचं सांगत CCPAने हा दावा फेटाळून लावला.
कोणत्या मिठाईची विक्री होत होती?
‘बिहार ब्रदर्स’ या ब्रँडअंतर्गत ‘चंदू ट्रेडिंग कंपनी’कडून ॲमेझॉनवर चार प्रकारच्या मिठाईंची विक्री केली जात होती. यामध्ये शुद्ध तुपातील लाडू, खव्याचे लाडू, बुंदी लाडू आणि गाईच्या दुधाचे पेढे यांचा समावेश होता. ही उत्पादने ‘अयोध्या श्री राम मंदिर प्रसाद’ म्हणून विकली जात असल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर CCPAने कारवाई करत 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला.