सोने-चांदीच्या दरात पुन्हा घसरण! आजचा भाव किती? जाणून घ्या ताजे दर

पुणे : देशांतर्गत बाजारात 19 ऑगस्ट 2026 रोजी सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाचा परिणाम देशांतर्गत मौल्यवान धातूंच्या किमतीवर दिसून आला. अमेरिकन बॉन्ड यिल्डमध्ये वाढ आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे.
MCX वर सोने-चांदी स्वस्त
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर सलग दुसऱ्या दिवशी कमी झाला असून तो 1,54,166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात तब्बल 2,349 रुपयांची घसरण झाली असून ती 2,30,070 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही मौल्यवान धातूंच्या किमतीत नरमाई दिसून आली. सोन्याचा दर 0.37 टक्क्यांनी घसरून 4,403 डॉलर प्रति औंसवर आला, तर चांदीच्या दरात एक टक्क्याहून अधिक घट झाली असून ती 62.895 डॉलर प्रति औंसवर पोहोचली आहे.


अमेरिकन बॉन्ड यिल्डचा परिणाम
अमेरिकन बॉन्ड यिल्डमध्ये वाढ झाल्याने सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण काही प्रमाणात कमी झालं आहे. त्याचबरोबर अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तेलाच्या वाढत्या दरांमुळे महागाईची चिंता वाढत असून त्याचाही परिणाम सोन्याच्या किमतीवर होत आहे.
दरम्यान, आता गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या मिनिट्सकडे लागलं आहे. त्यातून व्याजदरांबाबत भविष्यातील संकेत मिळण्याची शक्यता आहे.
प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा दर
देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका असल्याचं सांगण्यात आलं आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, पुणे आणि नागपूरमध्ये हा दर समान पातळीवर आहे.
चांदीचा देशांतर्गत दर सध्या 245 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 2,45,000 रुपये प्रति किलो असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. औद्योगिक क्षेत्रातील मागणीमुळे चांदीच्या किमतीला काही प्रमाणात आधार मिळत असला तरी MCX आणि किरकोळ बाजारातील दरांमध्ये फरक दिसून येतो.