CM फडणवीस केंद्रात जाणार? पुन्हा चर्चांना उधाण… दिल्लीतून मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, त्यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू असल्याने त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मात्र, केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याच्या चर्चांवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भेट महाराष्ट्रातील विविध प्रकल्प आणि प्रशासकीय विषयांबाबत असल्याचे स्पष्ट केले.

फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील प्रशासन आणि विविध विकास प्रकल्पांची माहिती पंतप्रधानांना दिली. केंद्र सरकारकडून अपेक्षित असलेल्या मदतीबाबतही पत्र देण्यात आले. उत्तन-विरार कॉरिडॉर, मेट्रो प्रकल्प आणि नदीजोड प्रकल्प यांसह विविध योजनांवर पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.


पर्यावरण मंजुरीबाबतही चर्चा
फडणवीस यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांचीही भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांच्या पर्यावरण आणि वनविषयक मंजुरी काही ठिकाणी प्रलंबित आहेत. या मंजुरींचा पाठपुरावा केल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संबंधित मंजुरी वेगाने देण्याचे आश्वासन मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
गोयल आणि सीतारमण यांच्यासोबत उद्योगविषयक बैठक
दरम्यान, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि निर्मला सीतारमण यांच्यासोबत उद्योगविषयक बैठक होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देशभरातील मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केंद्राच्या मदतीने उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतींची प्रगती आणि त्यातील अडचणी यावर बैठकीत चर्चा होणार आहे.
‘मी महाराष्ट्रातच आहे’, फडणवीसांचं स्पष्ट उत्तर
देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता त्यांनी या चर्चांना फारसे महत्त्व दिले नाही. “मी दिल्लीत असलो तरी चर्चा होते आणि मुंबईत असलो तरी चर्चा होते. ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे पतंग आणि फुगे उडवायचे आहेत, ते उडवू द्या. मी महाराष्ट्रात आहे. जनता आणि पंतप्रधान मोदी यांनी मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
“अनेकांना वाटते की मी दिल्लीत गेले पाहिजे, पण त्या सर्वांना सांगतो की मी मुंबईतच आहे,” असे म्हणत फडणवीस यांनी दिल्लीला जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.