काकूने ‘एक लाख’ देण्यास नकार दिला अन् पुतण्याचा संताप अनावर! चाकूने हल्ला, साथीदाराने ५५ हजारांचे दागिने लुटले


पुणे : पुण्यातील एकबोटे कॉलनी परिसरात पैशांच्या मागणीवरून नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. व्यवसायासाठी एक लाख रुपये मागितल्यानंतर काकूने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या ५८ वर्षीय पुतण्याने ६६ वर्षीय काकूवर धारदार चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर पुतण्याच्या साथीदाराने जखमी महिलेच्या कानातील सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली आहे.

ही घटना १५ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. दिनेश जुगराज सुराणा (वय ५८, रा. गंगाधाम) आणि त्याचा साथीदार फरमान मन्सूर पारकर (वय २८, रा. कोंढवा) हे दोघे महिलेच्या घरी गेले होते. दिनेश सुराणा याने व्यवसायासाठी काकूकडे एक लाख रुपयांची मागणी केली. मात्र, महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या दिनेशने धारदार चाकू काढून महिलेच्या गळ्यावर आणि डाव्या मनगटावर वार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिला गंभीर जखमी झाली. मात्र, जखमी अवस्थेतील महिलेची मदत करण्याऐवजी आरोपींच्या साथीदाराने तिच्या कानातील सोन्याचे वेल हिसकावल्याचा आरोप आहे.

फरमान पारकर याने महिलेच्या डाव्या कानातील सुमारे ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेल जबरदस्तीने ओढून घेतले. त्यामुळे महिलेच्या कानालाही दुखापत झाली. त्यानंतर दिनेश सुराणा आणि फरमान पारकर हे दोघेही घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दिनेश जुगराज सुराणा आणि फरमान मन्सूर पारकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून दोन्ही आरोपींचा शोध सुरू असून, हल्ल्याचे कारण आणि घटनेतील इतर बाबींचा पुढील तपास केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!