‘मोदी-शाह भेटींनंतरही पवारांचा निर्णय ठरला!’ NDAच्या चर्चांना ब्रेक; शरद पवारांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या एनडीएतील संभाव्य प्रवेशाच्या चर्चांना आता मोठा ट्विस्ट मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क सुरू होते. मात्र, पक्षाच्या बैठकीत शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या स्पष्ट संदेशामुळे या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळण्याची चिन्हे आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीत शरद पवार यांनी “आपण विरोधातच आहोत. कोणीही संभ्रमात राहू नये. जोमाने काम करा,” असा स्पष्ट संदेश दिला. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राजकीय भूमिकेबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे. विशेषतः महाविकास आघाडीच्या राजकारणाच्या दृष्टीने पवारांचा हा संदेश महत्त्वाचा ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आठही खासदारांनी मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर सर्व खासदारांची शरद पवार यांच्यासोबत बैठकही झाली. या सलग भेटीगाठींमुळे राष्ट्रवादी शरद पवार गट एनडीएच्या दिशेने वाटचाल करणार असल्याच्या चर्चांना जोर आला होता.

मात्र, पक्षाच्या दोन दिवसीय बैठकीत सुप्रिया सुळे यांनीही पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचे संकेत दिले. विविध जिल्ह्यांतील जिल्हाध्यक्षांनी पक्ष एनडीएसोबत जाणार का, असा थेट सवाल उपस्थित केला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच पार पडलेल्या संसदीय अधिवेशनातील सरकारविरोधातील आपल्या भाषणांचा दाखला दिला. त्यामुळे पक्षाची सध्याची भूमिका विरोधकांचीच असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.

‘सभागृहापासून रस्त्यापर्यंत लढा’ सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केवळ संसदेतच नव्हे तर जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरही संघर्ष उभा करण्याच्या सूचना दिल्या. जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेली संघटनात्मक पदे तातडीने भरून पक्षाचे काम वेगाने सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे सांगत लोकांच्या प्रश्नांवर ताकदीने लढण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शनिवार आणि रविवारी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा संघटनात्मक आढावा घेतला. आता केवळ कोकणातील जिल्ह्यांचा आढावा बाकी आहे. त्यामुळे एकीकडे दिल्लीतील भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आले असताना दुसरीकडे पक्षाने संघटन मजबूत करण्यावर भर दिल्याचे स्पष्ट होत आहे. शरद पवारांच्या ताज्या संदेशानंतर एनडीए प्रवेशाच्या चर्चेला किती दिवसांचा ब्रेक मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!