महाराष्ट्रात पुन्हा ऊन-पावसाचा खेळ! ‘या’ 5 जिल्ह्यांना यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

पुणे : राज्यात काही भागांत पावसाने विश्रांती घेतली असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. श्रावण महिना सुरू झाल्याने राज्यात सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, आता पुन्हा काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने आज राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या पाच जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता
जळगाव, धुळे, सोलापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेषतः मोकळ्या परिसरात असताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


उर्वरित राज्यात श्रावण सरी
राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये तुरळक श्रावण सरी बरसण्याची शक्यता आहे. काही भागांत ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी ऊन असे मिश्र वातावरण पाहायला मिळणार आहे. काही जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी असल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या प्रणालीला लागून समुद्रसपाटीपासून सुमारे 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात तुरळक पाऊस
मराठवाड्यात आज काही भागांत तुरळक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल, असे चित्र नाही. स्थानिक परिस्थितीनुसार ढगांची स्थिती आणि पावसाची तीव्रता बदलू शकते.
पुढील दोन दिवस पावसाची स्थिती कशी?
18 आणि 19 ऑगस्ट रोजीही राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर तुलनेने अधिक राहण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट किंवा जोरदार वारे सुरू असताना नागरिकांनी शक्यतो मोकळ्या जागेत जाणे टाळावे. तसेच घाटमाथ्यावरून प्रवास करताना स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.