पुणेकरांनो, अजून वेळ गेली नाही! 500 फूट उंच धबधबा, धुक्याची चादर अन् हिरवाईचा महासागर; विकेंडला ‘या’ ठिकाणी पर्यटकांची झुंबड

पुणे : पावसाळ्याचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पुण्याच्या आसपासची निसर्गरम्य पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांना खुणावत आहेत. सतत पडणारा पाऊस, डोंगरांवर पसरलेली हिरवी शाल, दऱ्यांमध्ये उतरलेले ढग आणि प्रचंड वेगाने कोसळणारे धबधबे यामुळे अनेक ठिकाणांचे रूपच पालटले आहे. त्यामुळे विकेंडच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि परिसरातील पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देत आहेत.
पुण्यापासून सहज पोहोचता येणारा ताम्हिणी घाट सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. घाटातील दाट जंगल, धुक्यात हरवलेल्या डोंगररांगा आणि रस्त्यालगत वाहणारे असंख्य धबधबे पर्यटकांना थांबून फोटो काढण्याचा मोह आवरत नाहीत. पावसाळ्यात या परिसरातील सौंदर्य अनेकपटींनी वाढते आणि निसर्गप्रेमींसाठी हा परिसर जणू स्वर्गच बनतो.

याशिवाय भिवपुरी धबधबा देखील पर्यटकांची पसंती मिळवत आहे. पुण्यापासून सुमारे 118 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण शांत वातावरण, स्वच्छ हवा आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी ओळखले जाते. ट्रेकिंग आणि साहसी पर्यटनाची आवड असलेले अनेक तरुण येथे आवर्जून भेट देतात.


दरम्यान, साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पावसाळ्यातील सर्वात देखण्या पर्यटनस्थळांपैकी एक मानला जातो. दाट जंगल आणि खोल दऱ्यांच्या पार्श्वभूमीवर कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत आहेत. तर लिंगमळा धबधबा आपल्या भव्यतेमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पुण्यापासून सुमारे 131 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा तब्बल 500 फूट उंचीवरून कोसळतो. धबधब्याभोवती तयार होणारे धुक्याचे वलय आणि गर्जना करणारा पाण्याचा प्रवाह पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरत आहे.
सुट्टी संपण्यापूर्वी निसर्गाच्या सानिध्यात काही क्षण घालवायचे असतील, तर पुण्याजवळील ही ठिकाणे उत्तम पर्याय मानली जात आहेत. मात्र, वाढता पाण्याचा प्रवाह आणि निसरडे दगड लक्षात घेता पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यातील महाराष्ट्राचे हे निसर्गवैभव सध्या पर्यटकांना अक्षरशः प्रेमात पाडत आहे.