वाढदिवसाचा केक खाताना मेलेली पाल दिसली! 7-8 जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

मुंबई : नालासोपाऱ्यात वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान केकमध्ये मृत पाल आढळल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. केक खाल्ल्यानंतर काही जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यातील नीलकंठेश्वर बिल्डिंगमध्ये एका मुलीचा वाढदिवस साजरा करण्यात येत होता. यासाठी जवळच्या केक शॉपमधून केक आणण्यात आला होता. सेलिब्रेशनदरम्यान पाहुण्यांनी केक खाण्यास सुरुवात केली. याचवेळी केकमध्ये मृत पाल आढळल्याचा दावा करण्यात आला.

हा प्रकार समोर येताच उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही जणांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नालासोपारा येथील विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.


रुग्णालयात दाखल झालेल्यांमध्ये उर्मिला वर्मा (32), सलोनी गुप्ता (16), सुदीक्षा शाह (19), आफिया इद्रिस (24), रुबी शाह (40), शिव गुप्ता (10), प्रियांश वर्मा (2), परी यादव (7), प्रिया वर्मा (8), रुद्र शाह (13) आणि प्राची यादव (8) यांचा समावेश असल्याची माहिती आहे. सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, संबंधित व्यक्तींना नेमका त्रास कशामुळे झाला, याबाबत अधिकृत वैद्यकीय अहवाल अद्याप समोर आलेला नाही. तसेच केकमध्ये मृत पाल आढळल्याच्या दाव्याची अधिकृत पुष्टीही झालेली नाही.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) या प्रकरणाची दखल घेतली जाते का आणि संबंधित केक दुकानावर कोणती कारवाई होते, याकडे आता लक्ष लागले आहे. अधिकृत तपास आणि अहवालानंतरच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.