“29 ऑगस्टला अंतरवालीत फैसला!”; मनोज जरांगेंची मराठा समाजाला हाक, ‘अर्ज घ्या आणि थेट लढाईत उतरा’


अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवे वळण देत मनोज जरांगे पाटील यांनी समाजबांधवांना मोठे आवाहन केले आहे. आरक्षण, कुणबी नोंदी, रखडलेल्या नियुक्त्या, शिष्यवृत्ती आणि विविध योजनांपासून वंचित राहिलेल्या मराठा तरुणांनी आपले अर्ज आणि कागदपत्रांसह थेट अंतरवाली सराटीत दाखल व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. “प्रश्न सुटेपर्यंत अंतरवाली सोडायची नाही,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.

जरांगे पाटील यांनी सांगितले की, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातून निवड झालेल्या पण नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांनी आपल्या प्रकरणाची सर्व कागदपत्रे आणावीत. तसेच पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा व्याज परतावा आणि इतर सरकारी योजनांचा लाभ न मिळालेल्या नागरिकांनीही अर्ज सादर करावेत. प्रत्येक अर्जाची स्वतंत्र नोंद घेऊन त्याचा पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. अनेक पात्र नागरिकांची प्रकरणे जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचा दावा करत, “ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांनी सर्व पुरावे घेऊन यावे. प्रमाणपत्र मिळेपर्यंत लढा थांबवायचा नाही,” असे ते म्हणाले.

सरकारच्या धोरणांवर निशाणा साधताना त्यांनी सारथीच्या बंद पडलेल्या योजना, रखडलेले शासकीय निर्णय, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे आणि भरती प्रक्रियेतील विलंब यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाने एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचे आदेश दिले. आंदोलनाच्या ठिकाणी गोंधळ घालू नये, अधिकारी किंवा मंत्री आल्यास संयम राखावा आणि प्रत्येक प्रश्नाची नोंद लेखी स्वरूपात करावी, असे त्यांनी सांगितले. समाजाच्या प्रश्नांसाठी येणाऱ्यांचे स्वागत असेल, मात्र राजकीय हेतूने येणाऱ्यांना स्थान नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीत हालचाली वाढल्या असून राज्यभरातील मराठा समाजाचे लक्ष आता या आंदोलनाकडे लागले आहे. आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!