पुण्याच्या रस्त्यावर मध्यरात्री बिअरच्या बाटल्या अन् कारचे स्टंट; चौघांना पोलिसांनी पकडलं, नेमकं काय घडलं?

पुणे : पुण्याच्या डेक्कन परिसरात मध्यरात्री मद्यप्राशन करून भरधाव कारमधून धोकादायक स्टंट करणाऱ्या चौघांवर डेक्कन पोलिसांनी कारवाई केली आहे. सेनापती बापट रोड, नळ स्टॉप आणि डेक्कन परिसरात या तरुणांनी कारच्या खिडक्या उघडून हातात बिअरच्या बाटल्या घेतल्या आणि मोठमोठ्याने आरडाओरड करत रस्त्यावर धिंगाणा घातला. त्यांच्या या कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी नंबरप्लेटच्या आधारे त्यांचा शोध घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हरियाणातून पुण्यात मित्रांना भेटण्यासाठी आले होते. रात्री मित्रांसोबत पार्टी केल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केले आणि त्यानंतर कारमधून शहरात फिरताना स्टंटबाजी सुरू केली. कार वेगाने धावत असताना काही तरुणांनी खिडकीतून अर्धे शरीर बाहेर काढले होते. हातात बिअरच्या बाटल्या घेऊन ते आरडाओरड करत असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला.

या प्रकाराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यातील कारची नंबरप्लेट तपासली. वाहनाच्या क्रमांकावरून तरुणांचा माग काढत डेक्कन पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक रस्त्यावर धोकादायक पद्धतीने स्टंट करणे याबाबत पुढील तपास केला जात आहे.


या प्रकरणात पोलिसांनी चारही तरुणांना अटक केली आहे. पार्टी केल्यानंतर नशेत हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती तपासातून समोर आली आहे. त्यांनी नेमका किती वेगाने वाहन चालवले, स्टंटबाजी किती वेळ सुरू होती आणि या प्रकारामुळे इतरांना प्रत्यक्ष धोका निर्माण झाला का, याचीही माहिती पोलीस घेत आहेत.
तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्यानंतर पुणेकरांकडून संताप व्यक्त करण्यात आला. सार्वजनिक रस्ते हे स्टंटबाजीसाठी नसून अशा प्रकारांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. काही नागरिकांनी पोलिसांच्या तातडीच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
पुण्यात रात्रीच्या वेळी मद्यधुंद वाहनचालकांकडून होणाऱ्या धोकादायक प्रकारांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असली, तरी अशा घटनांमुळे शहरातील वाहतूक शिस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवघेणे स्टंट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.