विद्यार्थ्यांवर कोसळला शाळेचा स्लॅब! जिल्हा परिषद शाळेत मोठी दुर्घटना; 13 विद्यार्थी जखमी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बबलाद गावातील जिल्हा परिषदेच्या कन्नड माध्यमाच्या शाळेत स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याने तब्बल 13 विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बबलाद येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत सुमारे 25 वर्षे जुनी आहे. काल दुपारी शाळेच्या पोर्चमधील स्लॅबचा काही थर अचानक खाली कोसळला. त्यावेळी खाली असलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर स्लॅबचा भाग पडल्याने 13 विद्यार्थी जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिकेसह जिल्हा परिषदेचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी विद्यार्थ्यांना त्वरित वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.


सुदैवाने या दुर्घटनेत कोणत्याही विद्यार्थ्याला गंभीर दुखापत झाली नाही. प्राथमिक उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्यात आले.
जुनी इमारत असल्याने दुर्घटना?
शाळेची इमारत जुनी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. या घटनेनंतर शाळेच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, पंचायत समिती सभापती सागर कल्याणशेट्टी यांनी बबलाद येथील शाळेसाठी नवीन इमारत तातडीने उभारण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळेच्या इमारतीची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात येत आहे.