तुकाराम मुंढे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मेडिकल दुकानदारांना थेट इशारा; ‘ही’ चूक पडणार महागात

पुणे : महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आता मेडिकल स्टोअर्समधील औषध विक्रीच्या व्यवहारांकडे लक्ष केंद्रित केले आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा अधिक औषधे खरेदी करण्यास रुग्णांना भाग पाडले जात असल्याचे आढळल्यास संबंधित मेडिकल स्टोअरवर कारवाई करण्यात येणार आहे. गंभीर प्रकरणांमध्ये औषध विक्रीचा परवाना रद्द करण्याचीही कारवाई होऊ शकते.
गरजेपेक्षा जास्त औषधे देणाऱ्यांवर कारवाई
डॉक्टरांनी रुग्णाला ठराविक संख्येने गोळ्या घेण्याचा सल्ला दिलेला असतानाही काही मेडिकल स्टोअर्समध्ये संपूर्ण स्ट्रिप खरेदी करण्यास सांगितले जाते, अशा तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे गरज नसलेली औषधे ग्राहकांकडे शिल्लक राहतात आणि त्यासाठी अतिरिक्त पैसेही खर्च होतात.

ही बाब लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने मेडिकल स्टोअर चालक आणि फार्मासिस्टना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्राहकाला गरजेपेक्षा अधिक औषधे घेण्यास सक्ती केल्याचे आढळल्यास संबंधित दुकानाविरोधात कारवाई केली जाणार आहे.


गंभीर प्रकरणात थेट परवाना रद्द
औषधांची विक्री करताना ग्राहकाच्या गरजेचा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचा विचार करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन गंभीर स्वरूपाचे असल्याचे आढळल्यास संबंधित मेडिकल स्टोअरचा औषध विक्री परवाना रद्द करण्याची कारवाईही होऊ शकते.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे औषध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रमाणापेक्षा अधिक औषधे घेण्यास भाग पाडले जात असल्यास ग्राहकांनी संबंधित प्रकाराची तक्रार प्रशासनाकडे करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तक्रार कुठे करायची?
अन्न व औषध प्रशासनाने तक्रारींसाठी 1800-222-365 हा हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तसेच ऑनलाइन तक्रार दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.