गडचिरोलीत सर्पदंशाने 3 विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्री फडणवीस संतापले, आश्रमशाळेबाबत मोठा निर्णय

गडचिरोली : राज्यभरात आदिवासी दिन साजरा होत असतानाच गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील निवासी आश्रमशाळेत अत्यंत दुर्दैवी घटना घडली. आश्रमशाळेच्या वसतिगृहात झोपलेल्या सहा विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, इतर विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. गंभीर प्रकृती असलेल्या विद्यार्थिनींना पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले. यापैकी एका विद्यार्थिनीला हवाई मार्गाने नागपूरला नेण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून कठोर कारवाईचे आदेश
या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत संबंधित आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


तसेच आश्रमशाळेची यापूर्वी पाहणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
पाहणी करूनही त्रुटी का आढळल्या नाहीत?
घटनेपूर्वी आश्रमशाळेची पाहणी करण्यात आली होती. मात्र, त्या पाहणीदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी संबंधित त्रुटी का आढळल्या नाहीत, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संस्थेसोबतच देखरेख करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व आश्रमशाळांची तपासणी होणार
गडचिरोलीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आश्रमशाळांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन आश्रमशाळांच्या तपासणीसाठी अधिक प्रभावी आणि सर्वंकष यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
या तपासणीत आश्रमशाळांच्या इमारतींची सुरक्षितता, वसतिगृहांची स्थिती, स्वच्छता, विद्यार्थ्यांच्या झोपण्याची व्यवस्था, साप-विंचू यांसारख्या विषारी प्राण्यांपासून संरक्षणाच्या उपाययोजना, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि आपत्तीच्या वेळी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था यांचा आढावा घेतला जाणार आहे.
रात्री झोपलेल्या विद्यार्थिनींना सर्पदंश
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी वसतिगृहात जमिनीवर झोपल्या असताना रात्रीच्या सुमारास सापाने सहा मुलींना दंश केला. सर्पदंशानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.