फक्त पाय लागला अन् जीव गेला! पुण्यात वडापाव घेताना वाद; घरी जाऊन झोपलेला तरुण पुन्हा उठलाच नाही


पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गणेश पेठ परिसरात घडली आहे. वडापाव खरेदी करताना चुकून पाय लागल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत तरुणाच्या छातीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर घरी झोपलेल्या तरुणाचा मृत्यू झाला.

गणेश पेठेतील डुल्या मारुती चौक परिसरात दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. शिवम राजेश परदेशी (वय 28, रा. गणेश पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी वैभव किशोर साळुंखे (वय 24, रा. गणेश पेठ) याला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवम परदेशी हा डुल्या मारुती चौकातील एका खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापाव घेण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा पाय वैभव साळुंखे याला लागला. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी वैभवने शिवमच्या छातीवर मारहाण केल्याची माहिती आहे.

हाणामारीनंतर शिवम घरी गेला आणि झोपला. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो उठला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. प्रतिसाद मिळत नसल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. छातीला झालेल्या दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

शिवम आणि वैभव हे एकाच परिसरात राहत असून त्यांची तोंडओळख होती, अशी माहिती समोर आली आहे. दोघांचेही वडील रिक्षाचालक असल्याचे सांगितले जाते. वैभव एका बिल्डरकडे अकाउंटंट म्हणून काम करत असल्याची माहिती आहे.

घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याआधारे संशयित वैभव साळुंखे याला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास फरासखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून 28 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याने गणेश पेठ परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे किरकोळ वाद किती गंभीर रूप धारण करू शकतात, यावरही चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!