पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ! 100 लिटर पाणी, 10 किलो पावडर अन् 4 किलो पाम तेल; असं बनत होतं ‘घातक दूध’


पुणे : सकाळी दारावर येणारं किंवा डेअरीतून विकत आणलेले दूध शुद्ध आहे की विष? अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी मंचर परिसरात उघडकीस आणलेल्या दूध भेसळ घोटाळ्याचे रोज नवे आणि भीषण पदर समोर येत आहेत.

चक्क वास न येणारा शाम्पू, पाम तेल, केमिकल आणि वे-पावडरचा वापर करून ‘घातक बनावट दूध’ तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात मंचर पोलिसांनी आता आणखी १० भेसळखोरांना अटक केली असून एकूण अटकेतील आरोपींची संख्या २४ वर पोहोचली आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, भेसळखोर घातक मिश्रण करून बनावट दूध तयार करायचे. १०० लिटर पाणी, १० किलो वे-पावडर, ४ किलो पाम तेल, २०० ml अल्फोक्स २०० (अत्यंत घातक केमिकल), २०० ml वास न येणारा शाम्पू आणि इतर रासायनिक घातक घटक..या सर्वांचे एकत्र मिश्रण करून तब्बल ११४ लिटर केमिकल युक्त बनावट दूध तयार केले जायचे. हे बनावट दूध शेतकऱ्यांकडून संकलित केलेल्या चांगल्या दुधामध्ये भेसळ करून थेट ग्राहक आणि प्रक्रिया उद्योगांना पुरवले जात होते.

मुख्य आरोपींकडून केमिकल व पावडर खरेदी करून स्वतःच्या डेअरी, गोठे आणि चिलिंग प्लॅन्टमध्ये हे बनावट दूध तयार करणाऱ्या १० जणांना ९ ऑगस्ट रोजी मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

१. संतोष बबन मोरे (वय ४३, रा. शिरापूर, पारनेर): पिंपळगाव रोठा येथे दूध डेअरी व संकलन व्यवसाय.
२. दत्तात्रय रामदास भागवत (वय ४१, रा. खडकवाडी, आंबेगाव): स्वतःचा गोठा आणि फिरून दूध संकलन.
३. गणेश सुदाम पडवळ (वय ४०, रा. सविंदणे, शिरूर): सविंदणे येथे दूध डेअरी.
४. आनंदा मारुती पवार (वय ५६, रा. टाकळकर वाडी, खेड): व्यवसायाचा तपास सुरू.
५. कुलदीप प्रकाश पवळे (वय ३०, रा. राजगुरुनगर, खेड): मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचा व्यवसाय.
६. रविराज बबन थोरात (वय ३२, रा. चांडोली बुद्रुक, आंबेगाव): कुलदीप पवळे यांच्याशी भागीदारी.
७. राजेंद्र भगवान सिनलकर (वय ४५, रा. लोणी, आंबेगाव): लोणी परिसरात दूध संकलन.
८. ओंकार पोपट गिरवले (वय २८, रा. देवळगाव सिद्धी, नगर): दूध संकलन आणि चिलिंग प्लॅन्ट.
९. आशिष विठ्ठल लोंढे (वय ३०, रा. एकलहरे, आंबेगाव): गाय गोठा व्यवसाय.
१०. सतीश महादू वाबळे (वय ४७, रा. चांडोली खुर्द, आंबेगाव): गाय गोठा व्यवसाय.

मास्टरमाईंड अन् सप्लायर कोण?

सुशांत हिंगे: या संपूर्ण घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाईंड).
संजोग लाल बिहारी यादव: रसायने आणि केमिकल्सचा मुख्य सप्लायर.
हेमंत टेके: वे-पावडरचा मुख्य पुरवठादार
संदीप लोढा: सुशांत हिंगेचा पार्टनर, जो केमिकल्सचा पुरवठा करण्यात सक्रिय होता.

घटनेचा सविस्तर प्रवास

०४ जुलै: FDA आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे ५ जिल्ह्यांत संयुक्त छापे, रॅकेटचा पर्दाफाश.
०५ जुलै: मंचर पोलिसांत २६ जणांवर गुन्हा दाखल, मुख्य सूत्रधार सुशांत हिंगेसह १३ जणांना अटक.
०५ ते १३ जुलै: आरोपींची कसून चौकशी; टप्प्याटप्प्याने पोलीस कोठडीनंतर त्यांची न्यायालयात रवानगी.
३१ जुलै: फरार १३ आरोपींपैकी १४ वा आरोपी सचिन सपकाळ याला जालन्यातून अटक.
०६ ऑगस्ट: १४ व्या आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या सुगाव्यावरून सुशांत हिंगेला पोलीस कोठडीत पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
०९ ऑगस्ट: रॅकेटशी जोडल्या गेलेल्या नव्याने १० आरोपींना अटक.

राजकीय कनेक्शनची जोरदार चर्चा!

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य विष्णु हिंगे यांचा पुतण्या आहे. विष्णु हिंगे हे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मात्र, दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाशी माझा काडीमात्रही संबंध नाही. जर यात माझा किंवा माझ्या कोणाचा संबंध आढळला, तर मी राजकीय व सामाजिक जीवनातून निवृत्ती घेईन.

सध्या मंचर पोलीस मुख्य सूत्रधार सुशांत हिंगे आणि नव्याने अटक केलेल्या १० आरोपींची समोरासमोर बसवून आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!