हाताचं फ्रॅक्चर अन् उपचारासाठी OTमध्ये गेली; ३ तासांनी बाहेर आला मृत्यूचा धक्कादायक निरोप, पुण्यात २८ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद अंत

शिरूर : हाताच्या फ्रॅक्चरवर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या २८ वर्षीय विवाहितेचा शस्त्रक्रियेदरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याने शिरूरमध्ये खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून पडल्याने हाताला दुखापत झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पूजा राहुल गई यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. मात्र, तब्बल तीन तासांनंतर डॉक्टरांनी त्या मृत झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. या घटनेनंतर पूजांच्या पतीने डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच पत्नीचा जीव गेल्याचा गंभीर आरोप केला आहे.
ही घटना शिरूर शहरातील बाबुरानगर परिसरातील ‘कोळपे मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल’मध्ये घडली. ४ ऑगस्ट रोजी पूजा गई या दुचाकीवरून जात असताना अचानक खाली पडल्या होत्या. या अपघातात त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. तपासणीनंतर हाताचं हाड फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. त्यानंतर डॉक्टरांनी फ्रॅक्चरवर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला.

६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता पूजांना ऑपरेशनसाठी ओटीमध्ये नेण्यात आलं. सुरुवातीला शस्त्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं कुटुंबीयांना वाटत होतं. मात्र, बराच वेळ होऊनही त्या बाहेर न आल्याने नातेवाईकांची चिंता वाढली. पती राहुल गई यांनी ऑपरेशन थिएटरच्या दरवाजाजवळ जाऊन आत काय सुरू आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.


सुमारे तीन तासांनंतर डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले आणि पूजांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी कुटुंबीयांना दिली. हाताच्या फ्रॅक्चरवर शस्त्रक्रियेसाठी दाखल केलेल्या महिलेचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे, पूजांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा झाला असल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होण्यासाठी पूजांचा मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं वैद्यकीय कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शवविच्छेदन अहवाल आणि पुढील तपासात वैद्यकीय निष्काळजीपणा झाल्याचं निष्पन्न झाल्यास संबंधित डॉक्टरांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पूजांच्या कुटुंबीयांनी केली आहे. सध्या पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून, ससून रुग्णालयाच्या अहवालानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे एका साध्या फ्रॅक्चरच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या पूजांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचं उत्तर आता शवविच्छेदन अहवालातून मिळणार आहे.