सोन्याने थेट दीड लाखांचा टप्पा गाठला! 7 दिवसांत ₹6,761 ची झेप; चांदीनेही मोडला तेजीचा विक्रम

नवी दिल्ली : सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात सुरू असलेल्या चढ-उतारांना आता तेजीची दिशा मिळाली आहे. चालू आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, 24 कॅरेट सोन्याचा दर दीड लाख रुपयांच्या अगदी जवळ पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीनेही एका आठवड्यात तब्बल 13 हजार रुपयांहून अधिकची वाढ नोंदवत ग्राहक आणि गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आठवडाभरापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1,42,860 रुपये होता. त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत गेली आणि आता हा भाव 1,49,621 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या एका आठवड्यात 24 कॅरेट सोनं तब्बल 6,761 रुपयांनी महागलं आहे. सोन्याच्या दराने दीड लाखांच्या जवळ मजल मारल्याने आगामी काळातील भाववाढीकडे बाजाराचं लक्ष लागलं आहे.

दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याचाही भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मागील आठवड्यात 1,30,860 रुपये प्रति 10 ग्रॅम असलेला दर आता 1,37,053 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच 22 कॅरेट सोन्याच्या दरात 6,093 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.


18 कॅरेट सोन्याच्या दरातही तेजी दिसून आली आहे. मागील आठवड्यात 1,07,145 रुपये असलेला 10 ग्रॅमचा भाव आता 1,12,216 रुपयांवर गेला आहे. या प्रकारच्या सोन्याच्या दरात 5,071 रुपयांची साप्ताहिक वाढ झाली आहे. त्यामुळे 18, 22 आणि 24 कॅरेट अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
दरम्यान, सोन्याबरोबरच चांदीनेही जोरदार उसळी घेतली आहे. मागील आठवड्यात एक किलो चांदीचा भाव 2,18,295 रुपये होता. मात्र, आठवडाभरात त्यात तब्बल 13,086 रुपयांची वाढ झाली आणि चांदीचा सध्याचा दर 2,31,381 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. त्यामुळे चांदीच्या किमतीतील ही वाढ सोन्याच्या तुलनेतही लक्षणीय मानली जात आहे.
मौल्यवान धातूंच्या या तेजीमागे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलत्या घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. डॉलर इंडेक्समध्ये झालेली कमजोरी आणि कच्च्या तेलाच्या दरातील घसरण याचा सोन्या-चांदीच्या बाजारावर परिणाम झाल्याचं सांगितलं जात आहे. जागतिक बाजारातील परिस्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल लक्षात घेता आगामी काळात मौल्यवान धातूंच्या दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोनं किंवा चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसह या धातूंमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचंही पुढील दरांकडे बारकाईने लक्ष आहे.