अभिजीत दीपकेंचं पोलीस संरक्षण काढा! ‘या’ संघटनेची मोठी मागणी; काय आहे प्रकरण?


मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या भेटीवरून पोलिसांशी झालेल्या वादाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने दीपके यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण तातडीने हटवावे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत. त्यांच्या आगामी राजकीय रणनीतीसंदर्भात बैठका सुरू असून विविध राजकीय नेते आणि नागरिक त्यांच्या भेटीसाठी घरी येत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मात्र, नागरिकांना आपली भेट घेण्यापासून पोलीस रोखत असल्याचा आरोप दीपके यांनी केला. यावरून त्यांचा एका पोलीस अधिकाऱ्याशी वाद झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. “मी कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, हे पोलिसांनी ठरवायचे नाही,” अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली होती.

पोलीस अधिकाऱ्याच्या ओळखीवरूनही सवाल

वादादरम्यान दीपके यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या विभाग, पोलीस ठाणे आणि पदाबाबत प्रश्न उपस्थित केले. नागरिकांना भेटण्यापासून रोखू नये, असे सांगत त्यांनी पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. तसेच संबंधित अधिकाऱ्याला आपल्या निवासस्थानाच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितल्याचेही समोर आले आहे.

संरक्षण हटवण्याची मागणी

या घटनेनंतर महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे दीपके यांचे पोलीस संरक्षण तातडीने हटवण्याची मागणी केली आहे. पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप संघटनेने केला असून, संबंधित प्रकरणात दीपके यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पोलीस संरक्षण हटवण्यात आले नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यामुळे अभिजीत दीपके आणि पोलीस यांच्यातील वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!