WhatsApp मेसेज ठरला महागात! एका क्लिकने पुण्यातील महिलेच्या पायाखालची जमीन सरकली; खात्यातून लाखो रुपये गायब

पुणे : पुण्यात सायबर फसवणुकीची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. WhatsApp वर आलेली ‘RTO ई-चलन ॲप’ची APK फाईल उघडणे एका 37 वर्षीय महिलेला चांगलेच महागात पडले. अवघ्या काही मिनिटांत त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख 79 हजार 297 रुपये परस्पर काढण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, देवाची उरुळी येथील संबंधित महिला 28 जुलै रोजी WhatsApp वापरत होत्या. त्यावेळी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून ‘RTO ई-चलन ॲप’ची APK फाईल पाठवण्यात आली. आपले काही वाहतूक चलन बाकी आहे का, असा संशय आल्याने त्यांनी ती फाईल उघडली.

मात्र, ही फाईल RTOची नसून सायबर भामट्यांनी पाठवलेली असल्याचे समोर आले. फाईल उघडल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर सायबर हल्लेखोरांना अनधिकृत प्रवेश मिळाला आणि काही वेळातच बँक खात्यातून 2,79,297 रुपयांचे अनधिकृत व्यवहार करण्यात आले.


खात्यातून पैसे कपात झाल्याचे बँकेचे मेसेज आल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने फुरसुंगी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
अशा फसवणुकीपासून कसे वाचाल?
WhatsApp किंवा SMS वर RTO, बँक, PM किसान, वीज बिल किंवा इतर सरकारी सेवांच्या नावाने आलेल्या अनोळखी APK फाईल्स कधीही उघडू नका. कोणतेही ॲप डाउनलोड करताना अधिकृत Google Play Store किंवा Apple App Storeचाच वापर करा.
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या लिंक, फाईल किंवा पैशांशी संबंधित संशयास्पद मेसेजवर क्लिक करू नका. संशयास्पद नंबर तात्काळ ब्लॉक आणि रिपोर्ट करा.