शाळेच्या आवारात सापाचा चावा अन् अनर्थ! बीडमध्ये 10 वर्षीय चिमुकलीचा उपचारापूर्वीच मृत्यू, परिसरात हळहळ

बीड : बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील शृंगारवाडी फाटा येथील ‘बाल नंदनवन इंग्लिश स्कूल’मध्ये दुर्दैवी घटना घडली. शाळेच्या आवारात एका 10 वर्षीय विद्यार्थिनीला सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळा परिसरासह तिच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
सारिका संतोष नरुटे (वय 10) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती मूळची गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक येथील रहिवासी होती. सध्या ती कुटुंबासह शृंगारवाडी फाटा परिसरात राहत होती आणि स्थानिक शाळेत शिक्षण घेत होती.

शुक्रवारी सकाळी सारिका शाळेच्या आवारात कपडे वाळत घालण्यासाठी गेली होती. यावेळी पटांगणात असलेल्या सापाने तिच्या पायाला दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच तिने आरडाओरड केली.


घटना समजताच शाळा व्यवस्थापन आणि उपस्थितांनी तिला तातडीने उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
शाळेच्या आवारात घडलेल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चिमुकल्या सारिकाच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.