‘सुनेत्रा पवार’ पोस्टवरून काँग्रेसची नरमाई; हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “खेद आहे… गैरसमजातून पोस्ट झाली”


मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून करण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टनंतर राज्यभरात उसळलेल्या राजकीय वादाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीव्र आक्रमक भूमिकेनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रथमच या प्रकरणावर अधिकृत भूमिका स्पष्ट करत संबंधित पोस्टबद्दल खेद व्यक्त केला आहे. ही पोस्ट कोणत्याही व्यक्तीचा अवमान करण्याच्या हेतूने नव्हती, तर संवादातील गैरसमजामुळे प्रसिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

वादग्रस्त पोस्ट समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निषेध आंदोलने झाली, तर महिला नेत्याचा अपमान केल्याचा आरोप करत काँग्रेसने जाहीर माफी मागावी आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या वाढत्या दबावानंतर काँग्रेस नेतृत्वाने स्पष्टीकरण देत नुकसान नियंत्रणाचा प्रयत्न केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, “स्त्रीदाक्षिण्य ही काँग्रेसची कायमची भूमिका आहे. संबंधित पोस्ट प्रसंगानुरूप होती, कोणत्याही व्यक्तीला लक्ष्य करण्याचा उद्देश नव्हता. तिचा चुकीचा अर्थ काढू नये,” असे नमूद केले. यासोबतच इंग्रजी पोस्टमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या टिप्पणीबद्दल खेद व्यक्त करत ती पोस्ट ‘मिसकम्युनिकेशन’मुळे प्रसिद्ध झाल्याचे स्पष्ट केले.

विशेष म्हणजे, सपकाळ यांनी थेट माफी मागितलेली नसली तरी ‘खेद’ व्यक्त करून पक्षाची भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे स्पष्टीकरण राजकीय नुकसान भरून काढण्यासाठीचे पाऊल मानले जात आहे. मात्र, विरोधक या खुलाशावर समाधान मानतील का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच या प्रकरणाला महिला सन्मानाशी जोडत काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आली, तर संबंधित पोस्ट महिलांचा अवमान करणारी असल्याचा आरोप करण्यात आला. काही नेत्यांनी जबाबदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही मागणी केली होती.

सपकाळ यांच्या स्पष्टीकरणानंतर आता राजकीय वातावरण आणखी रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेस पुढे अधिकृत माफी मागणार का, संबंधित पोस्ट करणाऱ्यांवर अंतर्गत कारवाई होणार का आणि राष्ट्रवादी काँग्रेस या स्पष्टीकरणानंतर आपली भूमिका बदलणार का, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावरील राजकीय संवादातील जबाबदारीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, एका पोस्टमुळे राज्यातील दोन प्रमुख पक्ष आमनेसामने आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात या वादाचे पडसाद आणखी उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!