‘गुंगी गुडिया’च्या एका शब्दाने महाराष्ट्र पेटला! काँग्रेसची सारवासारव, राष्ट्रवादीचा माफीसाठी आक्रमक पवित्रा

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत वापरण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून राज्यभर आंदोलनांचा धडाका सुरू झाला आहे. वाढत्या राजकीय दबावानंतर काँग्रेसने या प्रकरणावर स्पष्टीकरण देत खेद व्यक्त केला आहे.
सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मुंबईतील मंत्रालय परिसरातही राष्ट्रवादीकडून मूक आंदोलन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ जमलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसने जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. यावेळी ‘गुंगी नाही, वादळ आहे’, ‘सुनेत्रा वहिनी आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले की, महिलांचा अपमान करणारे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाही. काँग्रेसने केवळ खेद व्यक्त न करता स्पष्टपणे माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनादरम्यान कायदा हातात घेतला जाणार नाही, शांततेच्या मार्गाने निषेध केला जाईल, असेही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या वादावर भूमिका मांडली. काँग्रेससाठी स्त्रीदाक्षिण्य आणि महिलांचा सन्मान सर्वोच्च असल्याचे सांगत त्यांनी या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचा दावा केला. एका विशिष्ट राजकीय संदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होऊ नये, असे त्यांनी म्हटले. काँग्रेसकडून या प्रकरणी खेद व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणावरून भाजपने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यातून काँग्रेसची मानसिकता दिसून येत असल्याची टीका केली. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना भाजपवर पलटवार केला. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सपकाळ यांनी पुढे सांगितले की, काही शब्दांचा ऐतिहासिक संदर्भ असतो आणि त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली असून आता या विषयाला अधिक ताण देण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.
मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस या स्पष्टीकरणावर समाधानी नसून माफीच्या मागणीवर ठाम आहे. सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्यामुळे निर्माण झालेला हा वाद आता केवळ एका वक्तव्यापुरता मर्यादित न राहता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील नव्या राजकीय संघर्षाचे कारण ठरत आहे. आगामी काळात या मुद्द्यावरून आणखी आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.