मुलीने गुपचूप केलं कोर्ट मॅरेज; नातेवाईकांना कळताच संतापलेल्या बापाने मध्यरात्रीच संपवलं मुलीच आयुष्य

आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे ऑनर किलिंगची अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. चार वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर प्रियकरासोबत गुपचूप कोर्ट मॅरेज केलेल्या 24 वर्षीय मुलीचा तिच्याच वडिलांनी गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. मध्यरात्री घरातून आलेल्या किंचाळण्याच्या आवाजामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर संपूर्ण घटना उघडकीस आली. या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली असून आरोपी वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जैतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रताप नगर येथे विमल शर्मा (55) हे कुटुंबासह राहत होते. रविवारी मध्यरात्री घरातून जोरदार वादाचा आवाज आणि एका तरुणीच्या मदतीसाठी ओरडण्याचे आवाज येऊ लागले. काही वेळातच घरातील सर्व दिवे बंद झाल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी तातडीने 112 वर फोन करून पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना 24 वर्षीय अंकिता शर्मा घरात बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिच्या मानेवर गळा आवळल्याच्या स्पष्ट खुणा होत्या. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.


तपासादरम्यान समोर आले की, अंकिता ही उच्चशिक्षित असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. गेल्या चार वर्षांपासून तिचे अमित पचौरी या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. अमित इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) मध्ये जवान म्हणून कार्यरत आहे. कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोघांनी फेब्रुवारी 2026 मध्ये गुपचूप न्यायालयात विवाह केला होता. मात्र योग्य वेळ आल्यावर ही बाब घरी सांगण्याचा त्यांचा विचार होता.
काही दिवसांपूर्वी या विवाहाची माहिती नातेवाईकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर घरात सातत्याने वाद सुरू झाले. समाजात बदनामी झाल्याचा राग मनात धरून विमल शर्मा यांनी रविवारी मध्यरात्री मुलीशी पुन्हा वाद घातला. संतापाच्या भरात त्यांनी घरातील ओढणीने तिचा गळा आवळल्याचा आरोप आहे. अंकिताने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना घटनास्थळावरून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे ऑनर किलिंगच्या वाढत्या घटनांबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. प्रेमविवाह स्वीकारण्याऐवजी कौटुंबिक प्रतिष्ठेच्या नावाखाली टोकाचे निर्णय घेतले जात असल्याचे हे प्रकरण अधोरेखित करत असून, या मानसिकतेविरोधात कठोर सामाजिक आणि कायदेशीर उपाययोजनांची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.