मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! नितीन गडकरींना दिलासा; डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश

मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संबंधित कथित डीपफेक आणि एआयद्वारे तयार करण्यात आलेली बदनामीकारक सामग्री हटवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. गडकरी यांचे नाव, प्रतिमा आणि आवाजाचा गैरवापर करून सोशल मीडियावर दिशाभूल करणारी सामग्री प्रसारित केली जात असल्याचा दावा करण्यात आला होता.
गडकरी यांनी दाखल केलेल्या याचिकेत केंद्र सरकारच्या E20 इंधन कार्यक्रमाशी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा खोटा संबंध जोडणारे व्हिडिओ, ऑडिओ आणि मजकूर तातडीने हटवण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच गूगल, मेटा, एक्स आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर ही सामग्री रोखण्याचे निर्देश देण्याची विनंतीही करण्यात आली होती.

यावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित ऑनलाइन प्लॅटफॉर्मना आक्षेपार्ह सामग्री तात्काळ हटवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने व्यक्तिमत्त्व हक्क आणि प्रतिष्ठेचे संरक्षण महत्त्वाचे असल्याचे स्पष्ट करत, एआय तंत्रज्ञानाचा गैरवापर करून दिशाभूल करणारी सामग्री प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली.


गडकरी यांनी त्यांच्या संमतीशिवाय नाव, प्रतिमा, चेहऱ्याची ठेवण आणि आवाज वापरून तयार करण्यात आलेले एआय-आधारित ऑडिओ-व्हिडिओ तसेच बदनामीकारक मजकूर कायमस्वरूपी हटवण्याची मागणी केली होती. या सामग्रीमुळे त्यांच्या सार्वजनिक प्रतिमेला धक्का बसल्याचा दावा त्यांनी न्यायालयात केला.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने संबंधित सामग्रीला “अत्यंत बदनामीकारक, घृणास्पद आणि द्वेषपूर्ण” असे म्हटले. भविष्यातही गडकरी यांच्याविरोधात अशाच प्रकारची डीपफेक किंवा बदनामीकारक सामग्री प्रसारित झाल्यास संबंधित डिजिटल प्लॅटफॉर्मनी तातडीने कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.