दौंड – पुणे लोकल सेवेबाबत केंद्र सरकार सकारात्मक; रेल्वेमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

पुणे : दौंड – पुणे लोहमार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिक, नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी आणि रुग्णांच्या सोयीसाठी आमदार राहुल कुल यांनी सातत्याने सुरू ठेवलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळताना दिसत आहे.
या मार्गावर ईएमयू लोकल ट्रेन सुरू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांबाबत आमदार राहुल कुल यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ही भेट अत्यंत सकारात्मक ठरली असून, रेल्वेमंत्र्यांनी ईएमयू लोकल सेवेचा प्रश्न युद्धपातळीवर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन दिले आहे. यावेळी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे देखील विशेष उपस्थित होते.

दौंड–पुणे रेल्वे कॉरिडॉरच्या समस्यांबाबत आमदार ॲड. राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास सर्व बाबी आणून दिल्या होत्या. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी स्वतः केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करून या मागण्या प्राधान्याने सोडवण्याची शिफारस केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आमदार राहुल कुल यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे


यावेळी आमदार ॲड. कुल यांनी सध्या धावणाऱ्या जुन्या DEMU / MEMU गाड्यांऐवजी वेगवान ईएमयू लोकल सेवा तातडीने सुरू करावी, ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि महिला, दिव्यांग तसेच फर्स्ट क्लाससाठी स्वतंत्र डबे उपलब्ध होतील. गाड्यांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी त्वरित दुरुस्ती व अद्ययावत यंत्रणा उभी करावी, सकाळी ६:०० वाजता दौंडवरून सुटणारी DEMU गाडी हडपसरऐवजी थेट पुणे जंक्शनपर्यंत नेण्यात यावी, सकाळ – संध्याकाळच्या पीक अवर्समध्ये गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे आणि सकाळी ८:२० ते दुपारी ५:०० या वेळेत नवीन गाड्या सुरू करण्यात याव्यात, दौंड येथील इलेक्ट्रिक लोको शेडचे काम जलद गतीने पूर्ण करणे. आदी मागण्या केलेल्या आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत दौंड–पुणे मार्गावरील इलेक्ट्रिक लोको शेडचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच, या मार्गावर ईएमयू (EMU) लोकल सुरू करण्याबाबतची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
दौंड – पुणे रेल्वे कॉरिडॉर हा या भागाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाचा कणा आहे. प्रवाशांना भेडसावणारे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा सतत पाठपुरावा सुरू आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे लवकरच दौंडकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि जलद होईल.
— ॲड. राहुल कुल, आमदार (दौंड विधानसभा)