डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन; त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील उर्फ डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूरमध्ये निधन झाले.ते ९० वर्षांचे होते. मागील काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. डी. वाय. पाटील यांनी राज्यात मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली.
महाराष्ट्रात व इतरत्र अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करत शिक्षणाची ज्ञानगंगा अनेक विद्यार्थ्यांसाठी खुली केली. राजकीय-सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले.

काँग्रेसमध्ये नेते असलेले डी.वाय. पाटील १९५७ ते १९६२ दरम्यान कोल्हापूर शहराचे महापौर होते. १९६७ व १९७२ साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आले होते. डी. वाय. पाटील यांनी संस्था उभारणीतून नागरीक घडतात, समाजाची उभारणी होते, या धोरणातून राज्यात शैक्षणिक संस्थांचा विस्तार केला.


डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८३ मध्ये नवी मुंबई येथे रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. आज त्यांच्या ‘डी. वाय. पाटील ग्रुप’ अंतर्गत ७ पेखा जास्त अभिमत/खाजगी विद्यापीठे आणि १५० पेक्षा अधिक शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत.