मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाचं पत्र; राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणी वाढणार?


पुणे : राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र पाठवत पक्षाच्या घटनेतील काही दुरुस्त्यांबाबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या अडचणी वाढणार का, याची चर्चा रंगू लागली आहे.

निवडणूक आयोगाने २७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नावे हे पत्र पाठवले आहे. पत्रानुसार, २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या घटनेतील कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्त्यांना मान्यता देणारी अधिकृत कागदपत्रे आणि प्रस्ताव आयोगाकडे प्राप्त झालेले नाहीत.

अजित पवार यांच्या निधनानंतर २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली होती. याच बैठकीत पक्षाच्या घटनेतील काही महत्त्वाच्या कलमांमध्ये बदल करण्यात आले होते.

मात्र, त्या बदलांशी संबंधित अधिकृत कागदपत्रे आयोगाकडे जमा न झाल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने संबंधित दुरुस्त्यांना पाठिंबा देणारी सर्व वैध कागदपत्रे आणि प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी या पत्रावर प्रतिक्रिया देताना, हा निवडणूक आयोग आणि राजकीय पक्षांमधील नियमित तांत्रिक पत्रव्यवहाराचा भाग असून, यात कोणतेही वेगळे कारण नाही, असे स्पष्ट केले आहे. तथापि, निवडणूक आयोगाच्या या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अडचणीत येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!