भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात पराभव! प्रशांत किशोरांचा ऐतिहासिक विजय; बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर


नवी दिल्ली : बिहारच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवणारा निकाल समोर आला आहे. अनेक दशकांपासून भारतीय जनता पक्षाचा (भाजप) अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघात जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या निकालामुळे बिहारच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

१९९५ पासून बांकीपूर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व कायम होते. सुरुवातीला नवीन किशोर प्रसाद सिन्हा आणि त्यानंतर नितीन नवीन यांनी या मतदारसंघातून सलग विजय मिळवत भाजपचा गड अबाधित ठेवला होता. मात्र, या पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांनी हा अभेद्य किल्ला सर करत भाजपला मोठा धक्का दिला आहे.

३१ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर प्रशांत किशोर यांना ६३,२०३ मते मिळाली, तर भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांना ४४,२५० मते मिळाली. त्यामुळे प्रशांत किशोर यांनी १८,९५३ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. आरजेडीच्या उमेदवार रेखा गुप्ता यांना केवळ १४,०८५ मते मिळाली.

मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच प्रशांत किशोर आघाडीवर होते. ३१ पैकी २२व्या फेरीपर्यंत त्यांनी १२,८०९ मतांची आघाडी घेतली होती आणि त्यानंतर ती वाढवत अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले.

आरजेडी मुख्य लढतीतून बाहेर

या पोटनिवडणुकीत सुरुवातीला भाजप, जन सुराज आणि आरजेडी यांच्यात तिरंगी लढत होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मतमोजणीदरम्यान आरजेडीचे आव्हान पूर्णपणे निष्प्रभ ठरले. त्यामुळे ही लढत प्रत्यक्षात जन सुराज आणि भाजप यांच्यातच मर्यादित राहिली.

भाजपच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोरांचा झेंडा

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन नवीन राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर भाजपने युवा चेहरा म्हणून नीरज कुमार सिन्हा यांना उमेदवारी दिली. मात्र स्थानिक मतदारांचा बदललेला कल आणि युवकांचा वाढता पाठिंबा याचा फायदा प्रशांत किशोर यांना झाला.

कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष, भाजपमध्ये निराशा

विजय निश्चित होताच पटना येथील जन सुराज पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. दुसरीकडे विजयाचा विश्वास व्यक्त करत आधीच २०० किलो लाडूंची तयारी करणाऱ्या भाजपच्या गोटात मात्र निराशेचे वातावरण पसरले.

प्रशांत किशोर यांच्या या विजयामुळे बिहारमध्ये जन सुराज पक्षाने तिसरा राजकीय पर्याय म्हणून दमदार एंट्री केल्याची चर्चा सुरू झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!