नाशिकच्या खुर्चीचा ‘गेम’ पुन्हा रंगला! भुजबळांच्या नावावर चर्चा, गिरीश महाजनांच्या एका वाक्याने राजकीय हालचालींना वेग


नाशिक : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेल्या चर्चांना आता पुन्हा वेग आला आहे. शहरातील खड्ड्यांचा प्रश्न, नागरिकांचा रोष आणि विरोधकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करण्याची मागणी पुढे आली आहे. या मागणीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या मोजक्या पण महत्त्वपूर्ण वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांनंतर नागरिकांमध्ये नाराजी असून, याच पार्श्वभूमीवर काही ठिकाणी छगन भुजबळ यांना पालकमंत्री करण्याची मागणी करणारे बॅनर झळकले. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा रखडलेला विषय पुन्हा चर्चेत आला.

याबाबत बोलताना गिरीश महाजन यांनी छगन भुजबळ यांच्या अनुभवाचा उल्लेख केला. “भुजबळ साहेब ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ आहेत. त्यांच्याबद्दल लोकांच्या भावना मी समजू शकतो. मात्र पालकमंत्रिपदाचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे,” असे महाजन यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर भुजबळांच्या नावाची चर्चा आणखी वाढली आहे.

दरम्यान, महाजन आणि भुजबळ यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला. “आमच्यात कुठलाही अबोला नाही किंवा दुरावा नाही. आमचे संबंध चांगले आहेत. पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमावेळीही मी त्यांना स्वतः मंचावर घेऊन गेलो होतो,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.

नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाजन यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना महाजन यांनी राऊतांवर निशाणा साधला. “त्यांना बोलण्याची मुभा आहे, पण मला त्यांच्यासारखे बोलता येत नाही. माझ्यावर काही बंधने आहेत,” असे म्हणत त्यांनी राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

यावेळी रायगडच्या पालकमंत्रिपदावरही महाजन यांनी भाष्य केले. विधान परिषदेच्या जागेच्या निर्णयावेळी या विषयावर चर्चा झाल्याचे सांगत, रायगडचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या पंतप्रधानपदाच्या चर्चेवरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. “देवेंद्रजींमध्ये कोणतीही कमतरता नाही. महाराष्ट्रातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्च पदावर गेली तर त्यात गैर काही नाही. मात्र अशा मोठ्या निर्णयांचा अधिकार वरिष्ठ नेतृत्वाकडे असतो,” असे त्यांनी सांगितले.

नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. भुजबळांच्या नावाला मिळणारा प्रतिसाद, महायुतीतील अंतर्गत समीकरणे आणि आगामी राजकीय घडामोडी पाहता नाशिकच्या पालकमंत्रीपदाची खुर्ची पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!