पिंपरीत एकाच घरातून 3 मृतदेह; IIM शिक्षित कुटुंबाच्या अखेरच्या निर्णयाने शहर सुन्न!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर सुन्न झाले आहे. आर्थिक अडचणींच्या गर्तेत अडकलेल्या एका उच्चशिक्षित कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना समोर आली असून, या दुर्घटनेत कुटुंबप्रमुखासह पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. विनोद पिल्लई (वय 50), त्यांची पत्नी शैलेजा पिल्लई आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई (वय 19) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आर्थिक ताण आणि वाढत्या अडचणींमुळे हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिल्लई कुटुंब मोरवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होते. शैलेजा पिल्लई या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत समन्वयक म्हणून कार्यरत होत्या. मात्र, एका दिवशी त्या कामावर न पोहोचल्याने सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. वारंवार फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांना माहिती देण्यात आली. त्यानंतर घराचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच विनोद पिल्लई यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उपचार सुरू असतानाच पत्नी शैलेजा आणि मुलगी पौर्णिमा यांचाही मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठी आणि काही संशयास्पद वस्तू मिळाल्या असून, या प्रकरणाचा तपास संत तुकाराम नगर पोलिसांकडून सुरू आहे.


पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कुटुंब काही काळापासून आर्थिक अडचणींना सामोरे जात होते. पूर्वी हे कुटुंब नेहरूनगर परिसरातील स्वतःच्या घरात राहत होते. मात्र आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांना घर विकावे लागले आणि त्यानंतर ते मोरवाडी येथे भाड्याच्या घरात राहायला गेले. विनोद पिल्लई यांनी काही काळापूर्वी नोकरी सोडली होती, त्यानंतर कुटुंबावरील आर्थिक दबाव वाढल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे हे कुटुंब अत्यंत उच्चशिक्षित होते. विनोद पिल्लई यांनी आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतले होते, तर त्यांची मुलगी कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. पत्नी शैलेजा या शिक्षण क्षेत्रात कार्यरत होत्या. एवढे शिक्षण आणि स्थिर पार्श्वभूमी असतानाही कुटुंबाने घेतलेल्या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला आहे.
सध्या पोलिसांकडून कुटुंबाचे मोबाईल, ऑनलाइन व्यवहार आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणी केली जात आहे. या घटनेमागे नेमके कोणते कारण होते, याचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.