बाळूमामांच्या देवस्थानात 60 कोटींच्या पैशांचा नेमका खेळ काय? गुन्हा दाखल होताच उपनिबंधक गायब; EOWच्या तपासातून मोठे धागेदोरे समोर येणार?

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा देवस्थानात तब्बल 60 कोटी 75 लाख 28 हजार रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या या देवस्थानातील आर्थिक व्यवहारांवर आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) सोपवण्यात आला आहे.
या प्रकरणी देवस्थानाच्या तत्कालीन कार्याध्यक्ष तथा उपनिबंधक रागिणी खडके, तत्कालीन सचिव रावसाहेब वीराप्पा खोतकरी यांच्यासह काही विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांविरोधात भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर रागिणी खडके या संपर्काबाहेर गेल्याची माहिती समोर आल्याने तपास यंत्रणांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या देवस्थान शाखेचे निरीक्षक राजेंद्र गडकरी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, देवस्थानातील निधीचा वापर करताना नियमांचे उल्लंघन, आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव, तसेच संगनमत करून विश्वासघात आणि फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला असून, निधीचा वापर नेमका कुठे आणि कशासाठी झाला याची चौकशी सुरू झाली आहे.


या प्रकरणात तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्या भूमिकेबाबतही तक्रारदारांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांची भूमिका तपासली जावी, अशी मागणी करण्यात आली असली तरी त्यांच्याविरोधात अद्याप कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
काही दिवसांपूर्वी देवस्थानातील आर्थिक अनियमिततेचा मुद्दा सार्वजनिकरीत्या उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर प्राथमिक पडताळणी आणि कागदपत्रांच्या छाननीत कथित गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर आल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. आता बँक व्यवहार, कंत्राटांची प्रक्रिया, आर्थिक मंजुरी, निधीचे वितरण आणि संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू आहे. या तपासात आणखी काही व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि इतर राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळूमामा देवस्थानाशी संबंधित हा कथित गैरव्यवहार उघडकीस आल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच देवस्थानातील आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक व्हावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
आर्थिक गुन्हे शाखेचा तपास पुढे सरकत असताना या कथित 60.75 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारामागील संपूर्ण आर्थिक साखळी, जबाबदार व्यक्ती आणि निधीचा अंतिम वापर याबाबत अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.