फोनवर ‘दैवी शक्ती’चा खेळ, शेजाऱ्यासोबत संबंध ठेवल्यास नशीब फिरेल म्हणत रचलं कारस्थान; माजी भाजप पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अंधश्रद्धा, तंत्रज्ञान आणि खोट्या ओळखीचा वापर करून एका महिलेला जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःला पुण्यातील सरकारी अधिकारी असल्याचे भासवत एका महिलेचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तिच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील, मुलाचे भविष्य उज्ज्वल होईल आणि नशीब बदलेल, असे आमिष दाखवत तिला शेजारी राहणाऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात पीडित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली असून संशयित आरोपी सध्या फरार आहे.

चिमूर तालुक्यातील नेरी गावात राहणाऱ्या पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, मे २०२६ मध्ये तिच्या पतीच्या मोबाईलवर दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन आले. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख पुणे येथील सहकार आयुक्त कार्यालयातील ‘विद्या गोखले’ नावाच्या अधिकारी म्हणून करून दिली. सुरुवातीला त्या व्यक्तीने महिलेची नोकरी, जन्मतारीख आणि काही वैयक्तिक माहिती अचूक सांगितली. त्यानंतर ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि कुंडलीच्या आधारे तिच्या आयुष्यातील काही घटना सांगून तिचा पूर्ण विश्वास जिंकला.

विश्वास बसल्यानंतर त्या कथित अधिकाऱ्याने महिलेला तिच्या घरासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीकडे दैवी शक्ती असल्याचा दावा केला. त्या व्यक्तीशी जवळीक वाढवली आणि शारीरिक संबंध ठेवले तर तिचे नशीब उजळेल, तसेच मुलाचे भवितव्य सुरक्षित होईल, असा सल्ला देण्यात आल्याचा आरोप आहे. याचबरोबर तिच्या वैवाहिक आयुष्याबाबत आणि खासगी संबंधांबाबत अनेक वैयक्तिक प्रश्नही विचारण्यात आले.

पीडित महिलेने मात्र हा प्रकार संशयास्पद वाटू लागल्यानंतर संपूर्ण संभाषणाची पडताळणी केली. तिचे पती कॅन्सरग्रस्त असल्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये सर्व कॉल रेकॉर्डिंगची सुविधा सुरू होती. ही रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर ‘विद्या गोखले’ म्हणून बोलणारी व्यक्ती प्रत्यक्षात महिला नसून दत्तू पिसे असल्याचा संशय तिला आला. आरोपीने एआय किंवा इतर तांत्रिक माध्यमांच्या मदतीने महिलेचा आवाज तयार करून संवाद साधल्याचाही आरोप तिने केला आहे.

तक्रारीतील दत्तू पिसे हे पूर्वी भाजपचे तालुका उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. मात्र निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी काम केल्याच्या कारणावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले आहे. सध्या ते चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असल्याची माहिती आहे.

महिलेने तक्रारीत आणखी एक गंभीर दावा केला आहे. यापूर्वीही आरोपीने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी त्याला यश आले नव्हते. तसेच याआधीही एका नातेवाईक महिलेने त्याच्याविरोधात गंभीर आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार एकट्या पीडितेपुरता मर्यादित नसून इतर महिलांनाही लक्ष्य करण्यात आले असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. मोबाईल कॉल रेकॉर्ड, ऑडिओ रेकॉर्डिंग, वापरण्यात आलेले क्रमांक तसेच आवाज बदलण्यासाठी कोणते तांत्रिक साधन वापरण्यात आले होते का, याचाही तपास सुरू आहे.

या घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून अंधश्रद्धा, खोटी सरकारी ओळख आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या प्रकारांबाबत सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेषतः अनोळखी क्रमांकांवरून येणारे कॉल, दैवी शक्तींचे दावे किंवा वैयक्तिक आयुष्याशी संबंधित दबाव टाकणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!