पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रिपदाची मोठी ऑफर! कुणी दिलं आमंत्रण? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राजकारणातून निवृत्तीचा विचार करत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. अशातच काँग्रेसने त्यांना थेट पक्षात येण्याचे निमंत्रण देत “महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी” देण्याची ऑफर दिली आहे. या प्रस्तावामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडेंना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याचे खुले आमंत्रण दिले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यातील ओबीसी नेतृत्वाला अपेक्षित न्याय मिळालेला नाही, अशी भावना व्यक्त करत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर पक्षात अन्याय होत असल्याचा दावा केला.

“पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये आल्या तर त्यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते. पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील,” असे वडेट्टीवार म्हणाले. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


दरम्यान, पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या या ऑफरवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यानंतर आलेल्या या प्रस्तावामुळे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
यावेळी विजय वडेट्टीवार यांनी विदर्भातील ११ जिल्ह्यांत सुरू होणाऱ्या मंडल यात्रेची माहितीही दिली. या यात्रेत जातीनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, महाज्योती संस्थेला अधिक निधी, रिक्त बॅकलॉग पदे भरणे आणि ओबीसी समाजासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पीय तरतूद अशा विविध मागण्या मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय त्यांनी राज्य सरकारवरही टीका करत शेतकऱ्यांच्या जमिनींचे सक्तीने संपादन, तसेच समृद्धी महामार्गाच्या कामांमध्ये मोठ्या कंत्राटदारांना लाभ मिळत असल्याचा आरोप केला.