महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंहांना मोठा दिलासा; न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंच्या कथित लैंगिक छळ प्रकरणात भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीतील राऊज ॲव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी (३ ऑगस्ट) या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल देत बृजभूषण शरण सिंह आणि सहआरोपी विनोद तोमर यांची निर्दोष मुक्तता केली.
निकालापूर्वी बृजभूषण शरण सिंह न्यायालयात हजर झाले होते. त्यावेळी त्यांनी, “मी फक्त न्यायालयाचा निर्णय स्वीकारेन. माझ्या हातात काहीही नाही,” अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना आरोपांतून मुक्त केले.

महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणामुळे देशभरात मोठे आंदोलन झाले होते. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने त्यांना कैसरगंज मतदारसंघातून उमेदवारी न देता त्यांच्या मुलगा करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली होती. करण भूषण सिंह यांनी ही निवडणूक जिंकली होती.


या प्रकरणात सुमारे १,१३३ दिवसांत १२७ सुनावण्या पार पडल्या. २० जुलै २०२३ पासून बृजभूषण शरण सिंह जामिनावर होते. आता न्यायालयाच्या निकालानंतर त्यांच्या राजकीय पुनरागमनाच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये ते सक्रिय राजकारणात पुनरागमन करणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
यापूर्वी, मे २०२४ मध्ये न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गुन्हेगारी धमकीसह विविध आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. सहआरोपी आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी सहायक सचिव विनोद तोमर यांनाही या प्रकरणातून दिलासा मिळाला आहे.
दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात बृजभूषण शरण सिंह यांच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत महिलेचा विनयभंग, लैंगिक छळ, पाठलाग करणे आणि गुन्हेगारी धमकी यांसारख्या गंभीर कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या ताज्या निर्णयानंतर या बहुचर्चित प्रकरणाचा महत्त्वाचा न्यायालयीन टप्पा पूर्ण झाला आहे.