पुणेकरांनो, छत्री सोबत ठेवणं फायदेशीर ठरणार? पुढील ४८ तासांचा अंदाज जाणून घ्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात सुरू असलेल्या पावसाबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाने एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर लक्षणीयरीत्या ओसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
त्यामुळे संततधारेपासून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळण्याची चिन्हे असून हवामानात पुन्हा एकदा ऊन-सावलीचा खेळ पाहायला मिळणार आहे. रविवारी (२ ऑगस्ट) शहरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पहाटेच्या सुमारास काही भागांत हलक्या सरी कोसळल्या, मात्र त्यानंतर दिवसभर कधी ऊन तर कधी हलका पाऊस अशीच स्थिती होती. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरात केवळ ०.७ मिलिमीटर इतक्याच अल्प पावसाची नोंद झाली.

पावसाच्या या उघडिपीमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पुणे शहराच्या कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे. रविवारी शहराचे कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.


हवामान खात्याने पुणे आणि परिसरासाठी पुढील ५ दिवसांचा स्पष्ट पॅटर्न जाहीर केला आहे. पुढील २ दिवस पावसाचा जोर पूर्णपणे कमी होईल आणि शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता राहील. पाऊस ओसरल्यानंतर पुढील तीन दिवस आकाश पूर्णपणे ढगाळ राहील, ज्यामुळे काही भागात हलका सुखद गारवा किंवा हलका उकाडा जाणवू शकतो.
सध्या तरी पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता नसल्याने पुणेकरांना आठवड्याची सुरुवात काहीशा कोरड्या वातावरणाने करता येणार आहे. मात्र, सोमवारची सकाळची हलक्या पावसानंच झाली आहे.