E20 पेट्रोलवरून केजरीवालांचा केंद्रावर हल्लाबोल; 4 ऑगस्टला मोदींच्या निवासस्थानावर मोर्चा, तीन मागण्यांवर सरकारला घेरणार

नवी दिल्ली : E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीने केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी E20 इंधन धोरणावर प्रश्न उपस्थित करत सरकारकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. तसेच या मागण्या घेऊन 4 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
आम आदमी पार्टीने E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर ‘राष्ट्रीय टाऊन हॉल’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात देशभरातील नागरिकांनी E20 इंधन वापरामुळे येणाऱ्या अडचणी आणि अनुभव मांडले. कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल यांनी इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापरावर नाराजी व्यक्त केली. “जर इथेनॉल नागरिकांसाठी इतके फायदेशीर असेल, तर ते सरकारकडून सक्तीने का लागू केले जात आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केजरीवाल यांनी सांगितले की, 3 ऑगस्ट रोजी नागरिकांच्या मागण्यांच्या याचिका जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी सुमारे 100 जणांसह लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्यात येईल. या माध्यमातून E20 पेट्रोलबाबत नागरिकांच्या समस्या थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


E20 पेट्रोलच्या मुद्द्यावर ‘आप’कडून सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या आहेत. पहिली मागणी म्हणजे पेट्रोल पंपावर ग्राहकांना इंधन निवडण्याचा अधिकार मिळावा. ज्यांना E20 पेट्रोल घ्यायचे आहे त्यांना ते मिळावे, पण ज्यांना शुद्ध पेट्रोल हवे आहे त्यांच्यासाठीही पर्याय उपलब्ध असावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुसरी मागणी म्हणजे E20 पेट्रोलची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावी. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने ग्राहकांना आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला. तिसरी मागणी म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असताना भारतातील पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 रुपयांपेक्षा कमी असावेत.
केजरीवाल यांनी इथेनॉलच्या वापरावर अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या मते, E20 पेट्रोलमुळे काही वाहनधारकांना मायलेज कमी होणे, देखभाल खर्च वाढणे आणि वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्यासारख्या समस्या जाणवत आहेत. तसेच इथेनॉल उत्पादनाचा शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा मिळत नसल्याचाही त्यांनी दावा केला.
भारतामध्ये E20 पेट्रोल म्हणजे 20 टक्के इथेनॉल आणि 80 टक्के पेट्रोलचे मिश्रण आहे. केंद्र सरकारने इंधन आयात कमी करण्यासाठी आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण पुढे आणले आहे. मात्र 2023 पूर्वी तयार झालेल्या वाहनांच्या मालकांमध्ये या इंधनाबाबत चिंता असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, E20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत नाही, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. यावर केजरीवाल यांनी सरकारने संबंधित अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वी आम आदमी पार्टीने पंतप्रधानांना उद्देशून ऑनलाइन याचिका सुरू केली होती, ज्यावर दोन लाखांहून अधिक लोकांनी स्वाक्षऱ्या केल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे.
E20 पेट्रोलचा मुद्दा आता इंधन धोरणापलीकडे जाऊन राजकीय संघर्षाचा विषय बनला आहे. केजरीवाल यांच्या मोर्चाच्या घोषणेनंतर केंद्र सरकारकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.