पुढील दोन महिने कसा राहणार मान्सून? नवरात्रातही बरसणार पाऊस? हवामान विभागाचा मोठा अंदाज

पुणे : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, जून आणि जुलै महिन्यात अनेक भागांत झालेल्या पावसामुळे दोन महिन्यांची सरासरी जवळपास भरून निघाली आहे.
आता भारतीय हवामान विभागाने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांसाठी नवीन अंदाज जाहीर केला असून, त्याचवेळी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनीही राज्यातील पावसाबाबत वेगळा अंदाज व्यक्त केला आहे.

IMD च्या अंदाजानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशभरात सरासरीच्या 94 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये देशाच्या बहुतांश भागांत किमान तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकते. मात्र, मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


सध्या प्रशांत महासागरात मध्यम तीव्रतेचा एल निनो सक्रिय असून, वर्षाअखेरीस त्याचा प्रभाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे मान्सूनच्या उत्तरार्धात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास खरीप पिके, भाजीपाला आणि अन्नधान्य उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि महागाईवरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मात्र वेगळाच अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, ऑगस्टमध्ये राज्यात एक मोठा पाऊस होईल, तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस जोरदार बरसेल. 3 नोव्हेंबरपर्यंत राज्यात पावसाचा प्रभाव कायम राहू शकतो. सध्या कमी पाऊस झालेल्या अहिल्यानगर, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, परभणी, बारामती आणि पुणे या भागांतील पावसाची तूट परतीच्या पावसामुळे भरून निघेल, असा त्यांचा दावा आहे.
अर्थ मंत्रालयाच्या मासिक आर्थिक आढाव्यानुसार, मान्सूनच्या कमकुवत सुरुवातीमुळे खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. उर्वरित काळात एल निनोचा प्रभाव वाढल्यास शेती, अर्थव्यवस्था आणि महागाईवर त्याचे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील पावसाकडे शेतकरी आणि सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.