CJP वर मोठं संकट? परदेशी निधीप्रकरणी सरकारची मोठी हालचाल; चौकशीबाबत मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर 35 दिवस आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी च्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आंदोलनासाठी मिळालेल्या कथित परदेशी निधीची चौकशी केंद्रीय आणि राज्य यंत्रणांकडून सुरू असल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे.
भोयर यांनी सांगितले की, महाराष्ट्र गृहविभाग आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) या आंदोलनाशी संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी करत आहेत. निधीचा वापर योग्य आणि कायदेशीर कामांसाठी झाला असेल तर कोणतीही अडचण नाही. मात्र, देशात किंवा समाजात अस्थिरता निर्माण करण्यासाठी त्याचा वापर झाल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

CJP ची पार्श्वभूमी
कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना 16 मे 2026 रोजी अभिजीत दिपके यांनी केली. डिजिटल माध्यमातून सुरू झालेल्या या पक्षाला अल्पावधीतच सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळाला.


यानंतर बोस्टन विद्यापीठातून भारतात परतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी परवानगी घेऊन दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी आणि तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला हजारो तरुणांचा पाठिंबा मिळाल्याचा दावा करण्यात आला.
दरम्यान, भाजप आणि एनडीएच्या काही नेत्यांनी सुरुवातीपासूनच CJP ला परदेशातून निधी मिळाल्याचा आरोप केला होता. त्यावर अभिजीत दिपके यांनी, सरकारला संशय असेल तर त्यांनी खुशाल चौकशी करावी, अशी भूमिका घेतली होती.
दुसरीकडे, विरोधकांनी या चौकशीवर टीका करत, आंदोलन दडपण्यासाठी आणि CJP ची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने ही कारवाई केली जात असल्याचा आरोप केला आहे. आता तपासातून नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.