‘अमित शाह-सुनेत्रा पवार यांची बंद दाराआड बैठक, बाहेर काँग्रेस-भाजप आमनेसामने’; पुण्यात एका भेटीने बदललं राजकीय चित्र


पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. एका बाजूला शहरात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले असताना, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची हॉटेलमध्ये जाऊन भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली याबाबत उत्सुकता वाढली आहे.

अमित शाह शुक्रवारी रात्री उशिरा पुण्यात दाखल झाले. त्यांच्या मुक्कामासाठी निवडलेल्या हॉटेल परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप देण्यात आले. केंद्रीय सुरक्षा दल, पुणे पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक, डॉग स्कॉड आणि विशेष सुरक्षा पथके तैनात करण्यात आली होती. हॉटेलमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात आली, तर परिसरातील हालचालींवर सीसीटीव्हीद्वारे सतत नजर ठेवण्यात आली.

शाह यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसने आधीच आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार मार्केटयार्ड परिसरात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. पोलिसांनी संभाव्य तणाव लक्षात घेऊन काही कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले. याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनीही निदर्शनाचा प्रयत्न केल्याने परिस्थिती अधिक संवेदनशील बनली.

काँग्रेसच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे कार्यकर्तेही काँग्रेस भवनाबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले. घोषणाबाजी सुरू झाल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता निर्माण झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करत अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केली.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे. आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार, महाराष्ट्रातील सत्तासमीकरणे, विविध विकास प्रकल्प आणि केंद्र-राज्य समन्वय या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. मात्र, या बैठकीबाबत अमित शाह, सुनेत्रा पवार किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

यानंतर अमित शाह यांचा ताफा सारसबागेकडे रवाना होण्याच्या हालचाली सुरू झाल्या. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी जाणाऱ्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. कार्यक्रमस्थळी प्रवेशासाठी बहुपदरी सुरक्षा तपासणी करण्यात आली असून, प्रत्येक वाहन आणि व्यक्तीची तपासणी करण्यात आली.

दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनीही शाह यांच्या दौऱ्यावर निशाणा साधला. “देशाचे गृहमंत्री रात्रीच्या अंधारात पुण्यात येतात, संसदेत कमी आणि राज्य दौऱ्यांमध्ये जास्त दिसतात,” अशी टीका त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली.

पुण्यात आज दिवसभर घडलेल्या घडामोडींमुळे केवळ अमित शाह यांचा दौरा नव्हे, तर सुनेत्रा पवार यांची भेट, काँग्रेसचे आंदोलन, भाजपचा प्रतिकार आणि अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था हे सर्वच राज्याच्या राजकारणातील चर्चेचे प्रमुख विषय ठरले आहेत. आता या बंद दाराआड झालेल्या बैठकीत नेमकी कोणती रणनीती ठरली, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!