शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! ऑगस्टमधील पावसाचा अंदाज आला; मराठवाडा आणि विदर्भासाठी आनंदाची बातमी


मुंबई : जुलै महिन्यात राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आता ऑगस्ट महिन्यातील पावसाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा ऑगस्टमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, मराठवाडा आणि विदर्भासाठी दिलासादायक बातमी असून या दोन्ही विभागांत चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

यंदा जूनच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे पेरण्या काही प्रमाणात उशिरा झाल्या. मात्र, जूनअखेर आणि जुलैच्या सुरुवातीपासून राज्यभर दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळले असून राज्यात सुमारे 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

जुलै महिन्यात विदर्भात 484.7 मिमी, मराठवाड्यात 281.7 मिमी, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक, तर कोकणात तब्बल 1767.5 मिमी पावसाची नोंद झाली. सुरुवातीला एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, प्रत्यक्षात राज्यात जुलै महिन्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला.

दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि बागलाण या तालुक्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नाशिक शहरात सकाळपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली, तरी गंगापूर धरणातून सुमारे 3 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून प्रशासनाने नागरिकांना नदीकाठच्या भागात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!